मुंबई महापालिकेच्या लोकसेवा अधिक व्यापक, सार्वत्रिक करण्याचे राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 10 : बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी; सर्व लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध करून त्या नागरिकांना सहजगत्या आणि वेळेत उपलब्ध होतील यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले आहेत.

नवीन प्रशासन भवन, मुंबई येथील आयोगाच्या मुख्य कार्यालयात यासंदर्भात आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहरे) श्री.ए.एल.जऱ्हाड, पश्चिम उपनगरच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी आणि पूर्व उपनगरचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांचेसह नगरपालिका संचालनालयाचे संचालक श्री.मुथुकृष्णन तसेच महाऑनलाईन कंपनी, नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी उपस्थित होते.


आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत सर्व लोकसेवा विहित कालावधीत आणि विनासायास उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगून श्री.क्षत्रिय पुढे म्हणाले, या केंद्रांवर फक्त महानगरपालिकेच्याच नव्हे तर सर्व विभागांच्या सर्व सेवा उपलब्ध असणे अपेक्षित असून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. अशा केंद्रांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. देण्यात येणाऱ्या लोकसेवा, त्यांचा विहित कालावधी आणि अपिलीय अधिकारी याबाबतची माहिती फलकावर प्रदर्शित करावी.

ते पुढे म्हणाले, नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती होण्यासाठी लोकसेवा हक्क कायद्याबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. अधिकारी व कर्मचारी यांना कायदेविषयक आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यात यावे. नागरिकांना अधिसूचित लोकसेवा विहित कालमर्यादेत न मिळाल्यास किंवा संयुक्त‍िक कारण न देता सेवा नाकारल्यास ऑनलाईन अपील करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचनाही श्री.क्षत्रिय यांनी केली.

या बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी माहिती दिली, लोकसेवा हक्क कायद्याखाली महानगरपालिकेच्या एकूण ५८ सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी ४७ सेवा महापालिकेच्या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत व उर्वरित ११ सेवा सध्या ऑफलाईन असून लवकरच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महानगरपालिकेच्यावतीने या सेवा देण्यासाठी एकूण २४ वॉर्डात प्रत्येकी एक आणि मुख्यालयात एक याप्रमाणे २५ सुविधा केंद्रे उघडण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली. यावर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ३२० आपले सरकार सेवा केंद्रे कार्यरत असून महापलिकेच्या सेवा आपले सरकार पोर्टलद्वारेही देणे सुरू केल्यास महानगरपालिकेच्या केंद्रांव्यतिरिक्त या सर्व केंद्रांमधूनही नागरिकांना सर्व सेवा उपलब्ध होतील. त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व सेवा आपले सरकार पोर्टलद्वारेही उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना श्री.क्षत्रिय यांनी दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा