विधानसभा प्रश्नोत्तरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
विमा कंपन्या दोषी असल्यास काळ्या यादीत टाकणार 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई, दि. 28 : औरंगाबाद व लातूर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये लागवडीखालील क्षेत्र व पीक विमा क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात चौकशीअंती विमा कंपनी दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास त्या कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  विधानसभेत दिली.

सदस्य अजित पवार यांनी रब्बी हंगामातील पीक विमा योजनेतील गैरव्यवहारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

दरम्यान एका उपप्रश्नास उत्तर देताना कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे म्हणालेऔरंगाबाद येथे २.६८ लक्ष हेक्टर क्षेत्राऐवजी ८.४९ लक्ष हेक्टर विमा उतरवण्यात आला. तरलातूर येथे ७ लाख ८४ हजार क्षेत्राऐवजी १३ लाख १४ हजार क्षेत्राचा विमा उतरवण्यात आला असूनयामध्ये तफावत आढळून आली आहे. विमा कंपन्यांकडून बँक आणि कॉमन सर्विस सेंटरकडून हे काम करण्यात येते. विमा कंपन्यांबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात तफावत निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना आखण्यात येतील. विमा कंपनीने गैरव्यवहार केला असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही डॉ.बोंडे यांनी उपप्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
०००


राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात बीएएमएस डॉक्टरांची पदे भरणार – आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 28 : राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. या रूग्णालयात बीएमएस डॉक्टरांची पदे कंत्राटी पद्धतीने भरावयाची कार्यवाही सुरू असून, महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

येथे मुंबईतील राज्य कामगार विमा योजनेतील रूग्णालये आणि औषधांची दुकाने सुरू करण्यासंदर्भात सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री.शिंदे बोलत होते.

श्री.शिंदे म्हणाले, कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने बीएमएस डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने एका महिन्यात भरती करण्यात येईल. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या रूग्णालयाच्या सुविधात वाढ व्हावी, कामगारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच डॉक्टरांच्या शुल्कात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
०००कराड-चिपळूण महामार्गाचे काम गतीमान करणार 
– सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 28 : पावसाळी परिस्थिती लक्षात घेता आणि कोणतेही अपघात घडू नये यासाठी कराड-चिपळूण या महामार्गाचे काम गतीमान करण्यात येईल. या मार्गाचे रूंदीकरणाचे काम अपूर्ण राहिल्यासंदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आज विधानसभेत शंभुराज देसाई यांनी कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री.पाटील बोलत होते.

श्री.पाटील म्हणाले, कराड-चिपळूण महामार्गाचे काम तातडीने करण्यात येणार असून निविदेचा कार्यकाळ ४५ दिवसावरून ७ दिवसांचा करून कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच शाहुवाडी येथील कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. केंद्र शासनाच्या परवानगीनंतर कामास सुरूवात करण्यात येणार आहे. जुळेवाडी खिंडीतील पुलाची दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहितीही श्री.पाटील यांनी आज दिली.
०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा