मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सॅमसंगच्या नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
इन्फोटेनमेन्ट सिस्टिम्सच्या उत्पादनक्षमतेत होणार 12 पट वाढ
पुणे दि.3 : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या हरमन  या प्रकल्पामुळे ॲटोमोबाईल क्षेत्रात लागणारे इन्फोटेनमेन्ट सिस्टिमचे उत्पादन येत्या दोन वर्षात 12 पट वाढणार असून त्यामुळे सध्या  होत असलेल्या प्रति वर्षी उत्पादन 2 लाख युनिट्स मधे वाढ होऊन  सन 2021 पर्यंत  25 लाख युनिट्स उत्पादन प्रति वर्षी होणार आहे. राज्यातील खासगी क्षेत्रात झालेल्या 114 कोटी रुपयांच्या या  मोठ्या गुंतवणूकीमुळे  इन्फोटेनमेन्ट, टेलीमॅटिक्स, नेविगेशन आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्राला चालना मिळणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.


चाकण-म्हाळुंगे एमआयडीसी येथे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या हरमन  प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अमिताभ कांत, हरमन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष दिनेश पालिवाल, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे,  जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे ॲटोमोबाईल हब आहे. देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पादनात ॲटोमोबाईल क्षेत्राचा मोठा वाटा आहे. हे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. उद्योगपूरक धोरण राबविल्यामुळे महाराष्ट्र हे  गुंतवणुकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आम्ही केवळ शासक नसून गुंतवणुकीदांरांचे भागीदार म्हणून काम करीत आहोत. गुंतवणुकदारांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असून गुंतवणुकदार हेच महाराष्ट्राचे खरे ॲम्बॅसिडर बनले आहेत.
        

महाराष्ट्र सरकार हे केवळ शासक म्हणून नाही, तर  भागीदार म्हणून हातात-हात घालून सर्वांसोबत काम करत आहे. गुंतवणुकदारांसमोरील सर्व अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील कायदा  आणि सुव्यवस्था अत्यंत चांगली  असल्यामुळे गुंतवणुदारांचा मोठा विश्वास महाराष्ट्रावर आहे. गुंतवणुकदारांच्या  प्रगतीसोबत महाराष्ट्राची प्रगतीही होत आहे. राज्यातील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधीही झपाट्याने वाढल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले.


अमिताभ कांत म्हणाले, महाराष्ट्रात असलेल्या चांगल्या वातावरणामुळे गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत. महाराष्ट्राच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे आणि सकारात्मक पुढाकाराने गुंतवणुक महाराष्ट्राकडे येत आहे. देशाच्या विकासाला ॲटोमोबाईल क्षेत्रामुळे गती मिळत आहे. प्रधानमंत्र्यांच्या मेक इन इंडियाच्या यशस्वी धोरणामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात दिनेश पालिवाल म्हणाले, महाराष्ट्रातील पुणे एमआयडीसीत औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत चांगले वातावरण आहे. पहिल्या टप्प्यानंतर 2021 पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे विस्तारिकरण करण्यात येणार असून उत्पादन क्षमता तीन पट करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीमध्येही वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
      

हरमनचे उपाध्यक्ष प्रताब दिव्यांगम यांनी आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हारमनच्या उत्पादन युनिटला भेट देवून कामकाजाची पहाणी केली.
 हरमन कंपनीच्या चाकण प्रकल्पाची वैशिष्ट्य
- आंतरराष्ट्रीय पातळीवर कनेक्टेड कारसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती.
- कार इन्फोटेनमेन्ट सिस्टिमचे उत्पादन.
- सध्या प्रति वर्षी उत्पादन 2 लाख युनिट्स.
- सन 2021 पर्यंत 12 पट वाढून 25 लाख युनिट्स प्रति वर्षी होणार.
- मारुती सुझुकी, डेमलर (मर्सिडीज बेंझ), फोक्सवॅगन, टाटा मोटर्स, फिएट क्रिस्लर कार मध्ये हरमनच्या उत्पादनांचा वापर.
- टाटा मोटर्सकडून "सप्लायर ऑफ द इयर 2014" सन्मान.
- हरमनचा चाकण प्लान्ट हा ग्लोबल ऑटीमोटीव्ह मॅन्यूफॅक्टअरिंग नेटवर्कचा हिस्सा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा