कृषी संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रात १३६ प्रकल्प मंजूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नवी दिल्ली, दि. २६ : प्रधानमंत्री ‍किसान संपदा योजनेअंतर्गत (पीएमकेएसवाय) देशात अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात एकूण ७३० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून महाराष्ट्राला सर्वाधिक १३६ प्रकल्प मंजूर झाले आहेत.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने पीएमकेएसवाययोजनेंतर्गत देशभरातील ३३४ लाख मेट्रीक टन शेती उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी ३१ हजार ४०० कोटी गुंतवणुकीच्या अन्न प्रक्रियेसंबंधीत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशभरात ७३० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून यात सर्वाधिक १३६ प्रकल्प महाराष्ट्रासाठी मंजूर झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून वर्ष २०१९-२० दरम्यान देशभरातील २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून ५ लाख ३० हजार ५०० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्रासाठी  ६७ शीतगृह मंजूर

पीएमकेएसवाय योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी मंजूर प्रकल्पांपैकी सर्वाधिक ६७ प्रकल्प शीतगृहांची आहेत. यासोबतच राज्यासाठी २२ अन्न चाचणी प्रयोगशाळा मंजूर करण्यात आल्या असून अन्न प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी पूरक अशा १२ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, राज्यात ८ शेतमाल प्रक्रिया क्लस्टर, ३ मेगा फूड पार्क आणि अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधीत २४ योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.

पीएमकेएसवाययोजनेंतर्गत महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशला ६६, गुजरातला ५५ तर तामिळनाडूला ५० प्रकल्प मंजूर झाले आहेत. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा