मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधी, मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 29 : लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) नुसार मनाई करण्यात आली आहे. हे दिवस 'कोरडा दिवस' म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.


निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. तसेच मतदानापूर्वीचे 48 तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे 24 तास मद्यविक्री करण्यात येणारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल. आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.


तीन दिवस कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघामध्ये एकूण 4 टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी 7 मतदारसंघांसाठी, दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी 10 मतदारसंघांसाठी, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी 14 मतदारसंघांसाठी आणि 29 एप्रिल 2019 रोजी 17 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 23 मे 2019 रोजी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा