लोककलांच्या वस्तूंचे संग्रहालय उभारणार- विनोद तावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


सांस्कृतिक संचालनालयामार्फत ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान

मुंबई, दि. 28: महाराष्ट्राला समृद्ध लोककलेचा वारसा लाभला आहे. लोककलांमध्ये अनेक वाद्य, पोशाख यांचा समावेश असतो. या लोककलांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे दस्तऐवजीकरण करून या लोककला संबंधित वस्तूंची माहिती भविष्यातील युवा पिढीला करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोककला वस्तूंचे संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सोहळा, राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळा आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कार सोहळा पु.ल.देशपांडे कला अकादमी येथील कलांगण येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. तावडे बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालिका स्वाती काळे, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आज  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गेल्या वर्षीचे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार विजेते मधुकर नेराळे यांच्या हस्ते यावर्षीचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार लोकशाहीर बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांना देण्यात आला. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवेबद्दल श्री. मोमीन यांना राज्य शासनामार्फत जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला असून 5 लाख रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, सुलोचना नलावडे, हरिभाऊ बढे, मंगला बनसोडे, साधू रामा पाटसुते, अंकुश खाडे उर्फ बाळू, प्रभा शिवणेकर, भीमाभाऊ सांगवीकर, गंगारामबुवा कवठेकर, राधाबाई खोडे नाशिककर व मधुकर नेराळे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

श्री. तावडे यावेळी म्हणाले की, लोककला ही आपल्या राज्याचीच नव्हे तर देशाची श्रीमंती आहे. नवीन पिढीला आपल्या राज्यातील लोककला काय आहेत, त्यांची वाद्य, पोशाख, पटकथा यांच्या संबंधित माहिती मिळावी यासाठी लोककला संग्रहालय हे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. या लोककला संबंधित वस्तूंच्या संग्रहालयामुळे सांस्कृतिक ऐवजाचे जतन होणार आहे. लवकरच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने एक समिती गठीत करून या विषयावर अभ्यास करून हे संग्रहालय उभारणार असल्याचे श्री. तावडे म्हणाले. या संग्रहालयामुळे येणाऱ्या वर्षानुवर्षे तरुण पिढीला प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. आपल्या महाराष्ट्रातील कलाकारांनी आपल्या कलाविष्काराने देशातच नव्हे; तर जागतिक स्तरावरही महाराष्ट्राचे नाव पोहोचवले आहे. यापुढील काळातही या कलाकारांनी आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान द्यावे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री या नात्याने आणि सर्व जनतेच्या वतीने आज पुरस्कृत करण्यात आलेल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो.

महाराष्ट्रातील लोककलांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असून यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, अशी भावना श्री. तावडे यांनी व्यक्त केली.

कलाकार हा संस्कृतीच्या संचिताचा वाहक आहे. रंगमंचावर जे घडतं त्या घडविणाऱ्या कलाकाराला प्रकाश झोतात आणणे  आवश्यक आहे. जे कलाकार दुर्लक्षित राहिले आहेत त्यांना प्रकाश झोतात आणून त्या कलाकारांमधील विलक्षण कार्यक्षमतेला वाव देणे ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी असल्याचे श्री.तावडे म्हणाले.

सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना करण्यात आले सन्मानित

राज्य सरकारकडून दरवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रांत विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

आज  राज्य सरकारतर्फे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 जणांना राज्य पुरस्काराने सन्मानित केले गेले.  अभिनेते रवी पटवर्धन (नाटक), माधुरी विश्वनाथ ओक (कंठसंगीत), श्याम देशपांडे (उपशास्त्रीय संगीत), पं. प्रभाकर धाकडे (वाद्यसंगीत), अभिनेत्री उषा नाईक (मराठी चित्रपट), ह.भ.प. विनोदबुवा खोंड (कीर्तन/समाज प्रबोधन), चंद्राबाई अण्णा आवळे (तमाशा), शाहीर विजय जगताप (शाहिरी), माणिकबाई रेंडके (नृत्य), मोहन कदम (लोककला), वेणू बुकले (आदिवासी गिरीजन),  श्रीकांत धोंगडे (कलादान) यांना देण्यात आला. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांचाही करण्यात आला सत्कार

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा कला क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मानाला जातो. दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत, नाटक आणि नृत्य या कला क्षेत्रांतील निवडक कलाकारांना प्रदान केला जातो.  2017 च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकूण 42 कलाकारांना देण्यात आला. यामध्ये  चार कलाकार महाराष्ट्रातील आहेत. या चार जणांचा सत्कार आज करण्यात आला. लेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर, लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि ज्येष्ठ तबलावादक पंडित योगेश सम्सी यांच्याबरोरबच भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानासाठी नृत्यांगना संध्या पुरेचा यांचाही सत्कार करण्यात आला.

ओमकार सावंत यांची संकल्पना असलेला आणि अभंग रिपोस्ट यांचा बँड असलेला सुवर्ण संध्या असा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या नारकर आणि तुषार दळवी यांनी केले. तर अर्चना सावंत, निधी प्रभू, शिवशाहीर यशवंत जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनिल केंगर, सुकन्या काळण, आशिष पाटील या कलाकारांनी यात सहभाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा