महाराष्ट्रामध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
जागतिक मराठी साहित्य संमेलनात प्रकट मुलाखत


नागपूर, दि. 04 :  राज्यातील तरुणाई, विचारवंत व जनता हे राज्याला प्रचंड क्षमतेने पुढे नेत आहे. आम्ही केवळ मदत करतो. त्यामुळे त्याला चालना मिळते. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असलेले राज्य तयार करुन तरुणाईच्या हाताला काम देवू शकतो, अशी संधी निर्माण करायची असून महाराष्ट्र हे प्रचंड क्षमता असलेले राज्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत व्यक्त केले.

जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे व आशुतोष शेवाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिलीत. बालपण, समाजकारण, राजकारण आदी विविध पैलूंवर यावेळी प्रश्न विचारण्यात आलीत.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मागील तीन वर्षांत देशात जेवढी थेट विदेशी गुंतवूणक झाली त्यापैकी 42 टक्के महाराष्ट्रात झाली आणि यापूर्वीच्या वर्षांत 49 टक्के एवढी होती. राज्य पूर्वी पाचव्या क्रमांकावर होते. परंतु गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आदी चार राज्यांमध्ये झालेल्या एकत्र गुंतवणुकीपैकी एवढी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. ही आपली क्षमता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊ घातली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील सर्वात मोठा भागिदार ठरणार आहे.

ई-क्रांती संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारासोबतच ही क्रांती संपूर्ण जगात झपाट्याने बदलत आहे. या क्रांतीतून नवीन व्यवस्था निर्माण होत आहे. ज्या वेगाने जग बदलत आहे त्याच वेगाने आपल्यालाही बदलायचे असून या बदलाचा लाभ घ्यायचा आहे. यामध्ये नोकऱ्यांची संख्या कमी होईल, परंतु तेवढ्याच नोकऱ्यांच्या नवीन संधी निर्माण होतील. समाज माध्यम संदर्भात बोलताना ते म्हणाले की, आता भीती राहिली नाही. मनात येईल ते बोलता येते. त्यामुळे अफवा सुद्धा पसरविल्या जाऊ शकतात. या माध्यमांची तत्त्व समाजामध्ये रुजवावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

बालपणाविषयी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सरस्वती शाळेत शिकत असताना त्यावेळच्या शिक्षकांनी इंग्रजी ग्रामरची करुन घेतलेल्या तयारीमुळे ग्रामरची कधीही चूक होत नाही. तसेच रसायनशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांनी संकल्पना स्पष्ट करुन शिकविल्यामुळे आजही संपूर्ण स्मरणात आहे. कायद्याचे शिक्षण घेत असताना कायद्याच्या भाषाबद्दलचे ज्ञान दैनंदिन व्यवहारात अत्यंत उपयुक्त ठरत आहे. शिक्षकांनी शिकविताना मूळ संकल्पना अत्यंत स्पष्टपणे शिकविल्यामुळे ते कधीच विसरु शकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मागील विधानसभेच्या निवडणुकीसाठी 'व्हिजन डाकुमेंट' तयार केले होते. त्यामध्ये महाराष्ट्रात काय बदलले पाहिजे आणि हा बदल कसा करता येईल, याची मांडणी केली होती. सत्तेत आल्यानंतर त्यानुसार काही गोष्टी पूर्ण केल्या. काहींना सुरुवात केली. सगळ्याच गोष्टी पूर्ण करुन 100 टक्के करण्याचा प्रयत्न आहे आणि पूर्ण होतील. संधी आणि मानव संसाधन यांच्यातील तफावत हळूहळू दूर होईल. अशी अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्यामुळे संधी मिळतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


आरक्षणाच्या संधी, सामाजिक स्थित्यंतरे जीवनशैली आदी विषयावरही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास उत्तरे दिलीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा