कला प्रदर्शन हे भारत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आविष्कार - रवींद्र वायकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन म्हणजे राज्य तसेच भारतीय कला आणि संस्कृतीचा एक प्रसन्न आविष्कार आहे. कला प्रदर्शनात सादर होणाऱ्या कलाकारांच्या कलाकृतींमध्ये आशय तर आहेच, पण त्यांचे सादरीकरण देखील अद्भुत शैलींद्वारे व्यक्त झाले आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज सांगितले.

येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, प्रभारी कला संचालक आणि सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा आदी उपस्थित होते.

श्री. वायकर यावेळी म्हणाले, नवीन पिढीपर्यंत महाराष्ट्राची कला पोहोचविण्यासाठी आपली सांस्कृती आणि कलांचे संवर्धन केले पाहिजे. आजच्या काळात पुस्तकी ज्ञानासोबत कलेचेही ज्ञान असणे गरजेचे आहे.  यासाठी कलाविषय आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला पाहिजे.


एकाचवेळी सुमारे तीनशेहून अधिक कलाकारांच्या कलाकृती जहांगीर कला दालनात बघण्याची संधी म्हणजे कला विद्यार्थी, व्यावसायिक कलाकार, हौशी कलाकार, कला रसिक आणि कला संग्राहकांसह कलाकृती खरेदी करणाऱ्यांना अनोखी पर्वणी आहे. महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन सन १९५६ पासून कला संचालनालयामार्फत करण्यात येते.

यावेळी श्री. वायकर यांच्या हस्ते राज्य कला संचालनालयाच्या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार डॉ. प्रभाकर कोलते यांचा सत्कार करण्यात आला.चित्रकला, शिल्पकला, अप्लाईड आर्ट, ग्राफिक आणि दिव्यांग अशा एकूण १५ विविध विषयातील कलाकारांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या प्रदर्शनात सुमारे ३०० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. त्यातूनच परीक्षकांनी निवडलेल्या सर्व विभागातील मिळून एकूण पंधरा कलाकृतींना रोख दहा हजार रुपयाप्रमाणे पारितोषिके प्रदान करण्यात आली.

17 जानेवारी पर्यंत चालणारे हे कला प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा