मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सुरजकुंड मेळ्याचे’ उद्या उद्घाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

गड-किल्ले, छत्रपती शिवरायांचा पराक्रम यांच्यासह राज्याच्या संस्कृतीचे होणार दर्शन





नवी दिल्ली, दि. 31 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते हरियाणातील फरिदाबाद येथे आयोजित 33 व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळ्याचेउद्या, 1 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्राला या मेळ्याच्या थीम स्टेटचा मान मिळाला असून, महाराष्ट्रातील गड-किल्ले, छत्रपती शिवरायांचा पराक्रम तसेच महाराष्ट्राचे सण-उत्सव व गौरवशाली परपंरा दर्शविणारे विविध देखावे आणि रेखाचित्रांनी सुरजकुंड सज्ज झाले आहे. या मेळ्यात राज्याची हस्तकला, खाद्यपदार्थ व लोकसंस्कृती बघायला मिळणार आहे.


सुरजकुंड येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत हरियाणा पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा सुरजकुंड मेला प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विजय वर्धन यांनी मेळ्याच्या उद्घाटनाबाबत व संपूर्ण सज्जतेबाबत माहिती दिली .केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी , महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यावेळी उपस्थित होते.



यावेळी विजय वर्धन यांनी सांगितले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते या मेळ्याचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, हरियाणाचे पर्यटनमंत्री रामबिलास शर्मा, भारतातील थायलंडचे राजदूत चुटिन टॉर्न गांटा यावेळी उपस्थित राहतील.


सुरजकुंड मेळ्यात अवतरला महाराष्ट्र
या मेळ्याचे मुख्य कार्यक्रम स्थळ असणाऱ्या चौपाल रंगमंचाला ऐतिहासिक रायगड किल्ल्याचे स्वरुप देण्यात आले आहे. येथेच उभारण्यात आलेल्या मातीच्या छोट्या-छोट्या घरांवर हत्तीवर आरुढ छत्रपती शिवाजी महाराज तसेच गडावर लढणारे शूर मावळे चित्ररुपाने दर्शविण्यात आले आहेत. शेजारीच मराठमोळी गुढी उभारण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील दिवाळी सणाचे मुख्य आकर्षण असणारा आकाशकंदील या मेळ्यात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मेळ्याच्या मुख्यद्वाराच्या कडेलाच राज्यातील गड किल्ले यांच्या मोठमोठ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई शेजारील जगप्रसिद्ध एलिफंटा गुंफेतील त्रिमूर्ती ही आकर्षकरित्या सजविण्यात आली आहे. महाराष्ट्राची समृद्ध लोककलाही या मेळ्यात ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहे. वासुदेवाच्या वेशातील कलाकार या मेळ्यात भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना जनजागृती पर संदेश देण्यास सज्ज झाले आहेत. तसेच या मेळ्यात सांस्कृतिक कार्यकम व मनोरंजानासाठी उभारण्यात आलेल्या विशेष कट्टयावर महाराष्ट्रातील कलाकार भारूड, लावणी आदी लोककलाही सादर करणार आहेत.



महाराष्ट्राने केले देशाचे संरक्षण - विजय वर्धन
यावर्षीच्या सुरजकुंड मेळ्याची थीम स्टेट असणारे महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य असून इतिहासात देशाच्या संरक्षणासाठी या राज्याने घेतलेला पुढाकार चिरस्मरणीय आहे. भारत देशाच्या संरक्षणासाठी दोन लाख मराठा सैनिक हजारो मैल हरियाणातील पानिपत येथे अहमदशाह अब्दालीचा सामना करण्यासाठी आले होते. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. मात्र देश संरक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान अनन्यसाधारण असल्याचे विजय वर्धन यांनी यावेळी सांगितले. एवढेच नव्हे तर दक्षिण हरियाणात मराठ्यांचे राज्य होते.  हा गौरवशाली इतिहास असलेला महाराष्ट्र 33 व्या सुरजकुंड मेळ्याचे थीम स्टेट आहे. सतरा दिवस चालणा-या या मेळ्यात महाराष्ट्राची हस्तकला, खाद्यपदार्थ आणि वैविध्यपूर्ण संस्कृती देश व जगातील पर्यटकांना अनुभवायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरजकुंड मेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती देश व जगात पोहोचेल :विनिता सिंगल
या मेळ्यात महाराष्ट्राचे 75 स्टॉल्स उभारण्यात आले असून सर्वोत्तम 100 हस्तकलाकार विविध हस्तकलेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवणार आहेत. राज्यातील 100 कलावंतांचा चमू येथे दाखल झाला असून हे कलाकार महाराष्ट्राची वैविध्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण व मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. राज्याचे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थही याठिकाणी येणाऱ्यांना चाखायला मिळणार आहेत. या मेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती व पर्यटन स्थळे देश व जगात पोहोचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



मेळ्यात मुख्य चौपालावर दररोज सायंकाळी विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून महाराष्ट्राला महत्त्वाचे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा देण्यात आली आहे. मेळाव्याच्या उद्घाटनाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशासह शिवाजी महाराजांचा गनिमी कावासांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे. 79 फेब्रुवारी रोजीही महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय या सर्व कार्यक्रमाचे संयोजन व समन्वय करणार आहे.
सुरजकुंड मेळा प्राधिकरण व हरियाणा राज्य पर्यटन विभाग, केंद्र शासनाचा पर्यटन विभाग, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक विभाग, परराष्ट्र व्यवहार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 17 फेब्रुवारी 2019 दरम्यान 33 व्या सुरजकुंड मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश तसेच एकूण 30 देश या मेळ्यात सहभागी होत आहेत. या मेळ्यात थायलंडला सहयोगी देशाचा मान मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा