प्रत्येक क्षेत्रात सर्जनशीलता, नवकल्पना आणि उत्कृष्टता आणावी – राज्यपाल चे.विद्यासागर राव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
सेंट झेविअर्स शाळेच्या 150 वा वर्धापन दिनास राज्यपालांची उपस्थिती


मुंबई, दि. 5: शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग या क्षेत्रातील प्रगतीमुळे आज लोकांचे   जीवनमान सुधारण्यास यश मिळत आहे. स्वातंत्र्यांनंतरच्या सात दशकात भारताची जगातील विकसित राष्ट्रांमध्ये नोंद झाली आहे. आजच्या घडीला भारताला एक अशी शिक्षण व्यवस्था अपेक्षित आहे जी प्रत्येक क्षेत्रात चांगली विचारसरणी निर्माण करेल. येणाऱ्या काळात प्रत्येक क्षेत्रात सर्जनशीलता, नवकल्पना आणि सर्वात महत्त्वाची असलेली उत्कृष्टता आणावी, असे आवाहन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले.

सेंट झेविअर्स हायस्कूलच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभ कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, फादर फ्रान्सिस स्वामी, शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला सनी, गोदरेज समुहाचे आदी गोदरेज, HDFC बँकेचे दीपक पारेख, पोस्ट मास्टर जर्नल हरिश्चंद्र अगरवाल याबरोबरच शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

पोस्ट खात्याकडून सेंट झेविअर्स हायस्कूलच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित तयार करण्यात आलेल्या विशेष कव्हरचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 
गेल्या 150 वर्षात विविध क्षेत्रात या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहभागाबद्दल राज्यपाल श्री.राव यांनी अभिनंदन करुन ते यावेळी म्हणाले की,  समाजात शिक्षण हा महत्त्वाचा घटक असताना या शाळेने समाजाच्या प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेमध्ये सामावून घेतले आहे. सेंट झेविअर्स शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक पिढ्यांना आधुनिक शिक्षण आणि जीवनमूल्य  रुजवण्याचे धडे दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन निर्माण करण्याचे काम या शाळेने केले असून या शाळेतील विद्यार्थ्यांनी शहर, राज्य आणि राष्ट्राला त्यांच्या शिक्षणाचे योगदान दिले आहे.
या शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी पाहता मला अभिमान वाटतो. कारण या यादीतील सर्वच माजी विद्यार्थी गुणवंत आहेत. या शाळेने स्वातंत्र्य सैनिक, उद्योगपती,  खेळाडू, नेते देशाला दिले आहेत. शाळेचे संस्थापक फादर जेसुट्‌स तसेच या शाळेशी बांधिलकी असलेले माजी    शिक्षक, सध्या कार्यरत असलेले शाळा प्रशासक, शिक्षक यांचे अभिनंदन करतो कारण एक चांगली पिढी घडविण्याचे काम ते करत आहेत.

यावेळी खासदार अशोक चव्हाण, आदी गोदरेज, दीपक पारेख, डॉ.एरीक बोरजेस आणि क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना झेवियर्स रत्न ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

स्वातंत्र्यांनंतर भारताने सार्वभौमिक शिक्षणामध्ये प्रभावी पाऊल उचलले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात  भारतात साक्षरतेचा दर 12 टक्के इतका होता. आज साक्षरतेचा दर 40 टक्के इतका झाला आहे. हा प्रगतीचा आकडा खरोखरच उल्लेखनीय आहे. आजकालची पिढी ही फक्त उत्तीर्ण होण्यासाठी आणि गुणांसाठी शिकत असल्याचे दिसून येते. असे न होता विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे आवश्यक आहे. शाळेची उत्कृष्टता सिद्ध करण्यासाठी प्रत्येक शाळेने कार्यरत राहणे आवश्यक आहे. उत्कृष्टता एक सातत्याने चालणारा प्रयत्न आहे. त्यामुळे समाजाच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शाळांनी आपले काम नेकीने सुरु ठेवणे गरजेचे आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळांच्या परिवर्तन आणि पुरुत्थानामध्ये अधिक सक्रिय भूमिका निभावली पाहिजे, असेही राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले.

राज्यपाल म्हणाले, आज खेळ खेळण्याऐवजी विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर जास्त वेळ घालवत आहेत हे चित्र चिंताजनक आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मुलांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी संगीत, नृत्य, कला आणि इतर उपक्रमांवर समान भर देणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आवाहन करतो की, आपल्या मुलांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळाकडेही लक्ष द्यावे. आज बहुतेक शाळा क्रीडा आणि खेळ आणि इतर सह-अभ्यासक्रमांवर कमी लक्ष देत आहेत. बऱ्याच शाळांमध्ये खेळाचे मैदान नसते. नुकताच राजभवन येथे भारतरत्न  सचिन तेंडुलकर यांनी भेटलो होतो. यावेळी श्री.तेंडुलकर यांनी राज्यात 'युनियन यंग अँड फिट इंडिया' लाँच करण्याचे प्रस्तावित केले. प्रत्येक मुलाला, प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक युवकाला दररोज किमान एक तास मैदानावर असणे आवश्यक आहे.


सेंट झेविअर्स शाळेने आधुनिक शिक्षणासोबत क्रीडा, स्काऊटींग, संगीत बँड आणि इतर अभ्यासक्रमांमध्ये अग्रगण्य स्थान मिळविले आहे. या शाळेने ॲथलीट्‌स, फुटबॉलपटू आणि इतर उत्कृष्ट खेळाडू देशाला दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा