नागपूर येथील श्रेणीवर्धन व अतिविशेषोपचार सुवर्णजयंती इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही


नागपूर, दि. 4 : मुख कर्करोगासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात शासकीय दंत महाविद्यालयाचे योगदान मोलाचे असून या महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन तसेच दंतोपचारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोईसुविधा महाविद्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे श्रेणीवर्धन व अतिविशेषोपचार सुवर्णजयंती इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी येथे बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील दंतमहाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ.मिलिंद माने, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी, अधिष्ठाता डॉ.सिंधू गणवीर व मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शासकीय दंत महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी घडविले. येथे शिकलेले विद्यार्थी आज दंतचिकित्सा क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहेत. मुखकर्करोगाची भीषण समस्या आज भेडसावते आहे. महाविद्यालयाने विदर्भातील गावागावात जाऊन मुखकर्करोगाच्या प्रतिबंधासाठी जाणीव जागृती केली आहे. रुग्णसेवेचे मोठे काम महाविद्यालयाने केले असून मुखकर्करोगाविरोधात महत्वपूर्ण लढा देत या महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोठे कार्य केले आहे. दंत उपचाराच्या पद्धती आता अत्याधुनिक होत आहेत. दंत चिकित्सा आता एक कॉस्मेटीक क्षेत्रातील व्यवसाय म्हणूनही मान्यता पावत आहे. महाविद्यालयाची श्रेणीवाढ होत असून त्यामुळे पदवी शिक्षणासाठीच्या जागांमध्ये वाढ होणार आहे.  शासकीय  दंत महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी  तसेच महाविद्यालयात दंतोपचारावरील अत्याधुनिक सोईसुविधा व तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

प्रास्ताविकात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी म्हणाले,  शासकीय दंत महाविद्यालयाची नवी इमारत अनेक सुविधांनी सज्ज असेल, दंतोपचारासाठीचे सर्व अत्याधुनिक विभाग येथे असतील, पदवी शिक्षणासाठीच्या जागा वाढविण्यात येणार असून मध्य भारतातील दंतोपचारासाठीचे हे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र ठरेल असेही डॉ.मुखर्जी यांनी सांगितले.


सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ.सिंधू गणवीर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा