परतूरच्या धर्तीवर शिंदखेडामधील चिमठाण्यासह ३५ गावांमध्ये वॉटर ग्रीड योजना राबविणार - पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 8 : जालना जिल्ह्यातील परतूरच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे (तेडखाई ) गावासह अन्य ३५ गावांत वॉटर ग्रीड योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीटंचाई असणाऱ्या या ३६ गावांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिली.


याबाबत मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत श्री. लोणीकर बोलत होते, यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, सदस्य सचिव पी वेलारासू व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
  

यावेळी श्री.लोणीकर म्हणाले, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे (तेडखाई) व ३५  गावांत वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पाण्याचा स्त्रोत म्हणून तापी नदी, सुलवाडे बॅरेजचा उपयोग करण्यात येणार आहे. गुरुत्ववाहिनीच्या माध्यमातून गावातील उंच जलकुंभापर्यंत पाणी वाहून नेण्यात येणार आहे तर डी. आय पाईपचा उपयोग करून पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून नेण्यात येणार आहे. या योजनेसाठी अंदाजे १३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेचा सर्व्हे तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही श्री. लोणीकर यांनी यावेळी दिले.


शिंदखेडा तालुक्याला तापी नदीचा किनारा लाभलेला आहे. पण हा तालुका नेहमी दुष्काळग्रस्त असतो. त्यामुळे येथील जनतेला नेहमीच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. चिमठाणे (तेडखाई) ३६ गाव योजनेच्या माध्यमातून परिसरातील गावांचा कायमचा पाणी प्रश्न मिटणार आहे. त्यासाठी 170 किमी ची वितरण जलवाहिनी, पेडकाई माता मंदिर, आर्वे रूपनगर वाडी, शेवाळी गावाजवळ या तीन ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा