चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे साकारतोय गणिततज्ज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ४ : गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोपं करून सांगणारा गणिततज्ज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे आकाराला येत असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली. ते पुढे म्हणाले, याची घोषणा राज्य अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी ८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून चालू वर्षी ८२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला  आहे. यातून गणित नगरीमध्ये भास्कराचार्य यांचा ब्रॉण्झ धातूचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पागोडा, निरिक्षण मनोरा, पिण्याच्या पाण्याची आर.ओ सुविधा, एल.ई.डी. लाईटस्, पर्यटक निवासस्थान,  वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रवेशद्वार आणि इतर कामांसाठी  निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.                                                         

औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत करण्यात आला असल्याचे सांगून अर्थमंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, या जिल्ह्यात २६०.६१ चौ.कि.मी. चे  संरक्षित गौताळा औट्रमघाट अभयारण्य असून याचा १९७ .०६ चौ.कि.मी. चा भाग औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात येतो तर ६३.५५ चौ.कि.मी. चा भाग जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात येतो. डोंगरी भागात वसलेल्या या अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी-पशू-पक्षी यांचा अधिवास आहे. पितळखोऱा येथे  अजिंठा लेण्यामधील अतिशय सुंदर आणि पुरातण लेणी आहेत. सीताखोरी येथे मनमोहक धबधबा आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठी आहे.  चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे आद्य गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांची समाधी आहे. याच पाटणा परिसरात त्यांनी प्रथम शून्याचा शोध लावला तर गणितावर आधारित लिहिलेला लिलावती हा महान ग्रंथ देखील त्यांनी येथेच लिहिला. गणिताच्या गाढ्या अभ्यासाबरोबर त्यांनी खगोलशास्त्रीय ज्ञानार्जन ही याच परिसरात केले. येथे असलेले आद्यशक्ती चंडिकादेवीचे प्राचीन मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन येथे गणिततज्ज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प  या निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असून वनसंरक्षण आणि संवर्धनाच्या कामालाही गती मिळणार आहे. लोकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये गणितीय खेळाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाच्या कार्यशाळांचे आयोजन करणे, गणितविषयाच्या अनुषंगाने मोठे ग्रंथालय निर्माण करणे यासारख्या अनेक उद्देशाने हा गणितीय नगरी प्रकल्प आकाराला येत आहे.

गणित सोपं करून सांगणाऱ्या प्रतिकृती


आजपर्यंतच्या गणितावर आधारित त्रिमीतीय रचना, शून्य नव्हते तेव्हा आणि शून्य आहे तेव्हा  याविषयाची माहिती देणारी त्रिमीतीय रचना, वराह-महीर, ग्रह-तारे यांच्या प्रतिकृती, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, आकाश दर्शन, दुर्बिणीचे सादरीकरण, गणितावर आधारित ग्रंथ संपदा, अंकावरून वय ठरवणे, गणितीय कोडी, संख्यांची तुलना करण्यासाठीच्या प्रतिकृती, बहुभुजाकृती, क्षेत्रफळ, घनफळ तयार करण्यासाठीच्या प्रतिकृती, जडत्वाचे गुणधर्म अभ्यासण्यासाठीच्या प्रतिकृती, गती, चाल, काळ, वेग, संवेग या संकल्पना स्पष्ट करणाऱ्या प्रतिकृती, त्रिकोणीय- चौकोनीय, वर्तुळाकार खोलीमधून होणारा भूमितीय विभागांचा प्रवेश, पायथागोरस प्रमेयाची प्रतिकृती, आयलरचे सूत्र पडताळणीसाठीची प्रतिकृती, कोन समजून घेण्यासाठीची वर्तुळाकार प्रतिकृती, संभाव्यता प्रतिकृती, अंक गणितीय विभागाचा प्रवेश, विविध अंक, चिन्हे, संख्यारेषा यांच्या प्रतिकृतीमधून सम विषम संख्या ओळखण्यासाठीच्या प्रतिकृती, संख्या रेषेवर स्थित करण्यासाठीची उपकरणे, गॅबलींग वर्तुळ, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यासाठीचे चुंबकीय पटल अशा अनेक प्रकारच्या प्रतिकृती आणि खेळांची निर्मिती तिथे होणार आहे, अशी माहितीही श्री.मुनगंटीवार यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा