प्रयागराज कुंभमेळ्यात महाराष्ट्रातील जनतेचे स्वागत; भेट देण्याचे उत्तर प्रदेशचे नगरविकासमंत्री सुरेश खन्ना यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. ३ : मानवी संस्कृतीतील अद्वितीय सांस्कृतिक वारसा ठरलेला भारतातला कुंभमेळा उत्तर प्रदेश येथील प्रयागराज (अलाहाबाद) येथे १५ जानेवारी ते ४ मार्च 2019 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. अध्यात्मासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र येण्याचे पृथ्वीवरील हे एकमेव स्थान आहे. महाराष्ट्रातील जनतेने या कुंभमेळ्यास भेट द्यावी असे आवाहन उत्तर प्रदेशचे संसदीय कार्य आणि नगरविकासमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी केले.


मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे सहा वर्षानंतर होणाऱ्या प्रयागराज कुंभमेळा २०१९ साठीचे निमंत्रण आणि माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. खन्ना बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेश नगर विकास विभागाचे सचिव संजय कुमार, सीआयआय महाराष्ट्र राज्य समितीचे माजी संचालक सुनील खन्ना आदी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे श्री. खन्ना यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डिजिटल निमंत्रण यावेळी दिले.
अधिक माहिती देताना श्री. खन्ना म्हणाले, जानेवारीत आयोजित या भव्यदिव्य अशा कुंभमेळ्यास सांस्कृतिक, सुरक्षित आणि डिजिटल रूप देण्यात आले आहे. भारताची संस्कृती आणि पर्यटन जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कुंभमेळ्यातून केला जाणार आहे. ३ हजार २०० हेक्टर परिसरात आयोजित या कुंभमेळ्यास १२ कोटी भाविक उपस्थिती दर्शवतील, असा अंदाजही व्यक्त केला जात असून, महाराष्ट्रातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी आशा श्री. खन्ना यांनी व्यक्त केली.

श्री. खन्ना म्हणाले, जगभरातील सुमारे १९२ देशांतून एकूण १० लाख परदेशी पर्यटक उपस्थित राहणार आहेत. कुंभसाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी शासनाने निवास व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता, प्रवास यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुंभमेळा परिसरात आलिशान टेण्ट सिटी स्थापन करण्यात आली असल्याची माहितीही श्री. खन्ना यांनी यावेळी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा