अंधेरीतील आगीत १० जणांचे प्राण वाचविणाऱ्या सिद्धरामेश्वर हुमानाबादे यांना एक लाखाचे पारितोषिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


       
                    
नवी दिल्ली, दि. 1 :  मुंबईच्या अंधेरी भागातील ईएसआयसी रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 जणांचे प्राण वाचवून साहसी वृत्तीचा परिचय देणाऱ्या मुंबई येथील सिद्धरामेश्वर हुमानाबादे यांचा आज केंद्रीय कामगार कल्याण व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांनी 1 लाखाचे पारितोषिक देऊन आज येथे गौरव केला.


केंद्रीय कामगार रोजगार कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत मुंबई येथील अंधेरी परिसरातील राज्य कर्मचारी विमा मंडळाच्या (ईएसआयसी) रूग्णालयात डिसेंबर 2018 मध्ये अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले, याप्रसंगी साहस समयसूचकता दाखवित फूड डिलिव्हरी बॉय सिद्धरामेश्वर हुमानाबादे यांनी आगीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात दिला. यावेळी हुमानाबादे यांनी 10 जणांचे प्राण वाचविले. या साहसी कार्याची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री श्री. गंगवार यांनी केंद्रीय कामगार कल्याण व रोजगार मंत्रालयात हुमानाबादे यांचा 1 लाखाचे पारितोषिक देऊन गौरव केला.


यावेळी श्री. गंगवार म्हणाले,  मुंबईतील रूग्णालयात लागलेल्या आगीप्रसंगी जीवाची तमा बाळगता सिद्धरामेश्वर हुमानाबादे यांनी आगीत अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे केलेले साहसी कार्य कौतुकास्पद आहे. आगीतील दूषित वायूने हुमानाबादे यांना श्वास घेण्यास अडचणही झाली तरीही त्यांनी पीडितांना वाचविण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरु ठेवले. ईएसआयसी रूग्णालयाचे कर्मचारी नसतानाही आगीत सापडलेल्या लोकांचे प्राण वाचवून हुमानाबादे यांनी दाखविलेले साहस आणि निरपेक्ष सेवाभाव हा ईएसआयसीच्या संपूर्ण चमूसाठी संपूर्ण देशवासियांसाठी आदर्शवत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा