एलिफंटामधील जेट्टी वाढविण्यास व बेलापूरमध्ये शिपयार्ड क्लस्टर उभारणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बैठकीत विविध प्रकल्पांना मान्यता


मुंबई, दि. 7 : पर्यटकांच्या सोयीसाठी एलिफंटा (घारापुरी) येथील जेट्टी वाढवून त्याचा विकास करून तेथे पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करणे, बेलापूर येथे शिपयार्ड क्लस्टर व कार्गो जेट्टी उभारण्यास तसेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डास दोन नव्या अत्याधुनिक फेरी बोटी खरेदी करण्यास आज मुख्यमंत्री तथा बोर्डाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मेरीटाईम बोर्डाची 74वी बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली.


नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबईत रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करून सागरी वाहतुकीस चालना देण्यासाठी बेलापूर येथील मेरीटाईम बोर्डाच्या जागेवर शिपयार्ड क्लस्टर व कार्गो जेट्टी उभारण्याचा सुमारे 9.65 कोटी रुपयांचा प्रस्ताव बोर्डाने दिला होता. यामुळे अवजड यंत्रसामग्री, कार्गो वाहतुकीसाठी सुविधा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

एलिफंटा येथील जेट्टी लहान असल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे या जेट्टीचा विकास करण्यात येणार आहे. त्यामध्ये जेट्टीची रुंदी वाढविणे, पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे आदी कामे करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच मेरीटाईम बोर्डासाठी दोन नव्या फेरी बोटी घेण्यास यावेळी मान्यता देण्यात आली असून या बोटी गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा व गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या मार्गावर चालविल्या जाणार आहेत.


वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाजवळील बोर्डाच्या जेट्टीच्या ठिकाणी बार्जवर ग्लास हाऊस सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील जेट्टीचा विकास, धरमतर खाडीमधील शहाबाज (जि.रायगड) येथे कॅप्टीव्ह जेट्टी बांधणे, पनवेल येथील मौजे तरघर येथे कॅप्टिव्ह जेट्टी उभारणे, वसई खाडीमधील घोडबंदरजवळ बहुउद्देशीय जेट्टी उभारणे, अलिबागमधील थेरोंडा येथे मरिना प्रकल्प उभारणे आदी प्रस्तावांनाही यावेळी मान्यता देण्यात आली.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा