मुंबई, दि. २५ : राष्ट्रपिता
महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून
संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी
आयोजित केलेली 'स्वस्थ भारत यात्रे'चे आयोजन करण्यात आले होते.
या आयोजनात महाराष्ट्राने देशातील मोठे राज्य या गटात 'उत्कृष्ट
राज्य' म्हणून मान मिळविला आहे. याबद्दल अन्न व औषध विभागाचे
मंत्री गिरीश बापट यांनी विभागाच्या अधिकारी
व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
अन्न
सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएफएएसआय), नवी दिल्ली यांनी सुरु केलेली 'इट राइट इंडिया' चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी
संपूर्ण देशात दि. 16 ते 27 ऑक्टोबर
दरम्यान 'स्वस्थ भारत यात्रा' चे आयोजन
करण्यात आले होते.
स्वस्थ
भारत यात्रेमध्ये स्वास्थ्य मेळावे, अन्न चाचणी, प्रभात
फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर
स्पर्धा आदी कार्यक्रमांचे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. स्वस्थ भारत यात्रेची प्रत्यक्ष
सुरुवात जागतिक अन्न दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 16 ऑक्टोबर
रोजी झाली. यात्रेसाठी संपूर्ण देशात एकूण
६ मार्ग बनवले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील ३ मार्गांचाही समावेश होता.
महाराष्ट्रात 18 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत यात्रेने मार्गक्रमण
केले. प्रत्येक ट्रॅकवर साधारण २५ सायकलपटू होते. हे सायकलपटू ५० ते ६० कि.मी.
अंतर पूर्ण करुन प्रत्येक टप्प्यात २ ते ३ गावात आरोग्यविषयक जनजागृती केली व
महाराष्ट्रातील ३३ ठिकाणी भेटी दिल्या.
या
यात्रेचा 'इट राइट इंडिया' हा
मुख्य उद्देश असून 'आरोग्यदायी खा, सुरक्षित खा, पौष्टिक खा' (इट
हेल्दी, इट सेफ, इट फोर्टीफाईड) या
त्रिसूत्रावर आधारित आहे. 'इट हेल्दी' या
संकल्पनेमध्ये 'आज से थोडा कम' म्हणजेच
आहारातील साखर, मीठ व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी करणे,
आरोग्यदायी अन्नपदार्थांचे पर्याय उपलब्ध करणे विशेष करुन अखंड
कडधान्य, तृणधान्याचा वापर वाढवण्याबाबतच्या कार्यक्रमाचा
अंतर्भाव होतो. 'इट सेफ' या
संकल्पनेमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेवर भर देणे, खाद्यतेलाचा
पुनर्वापर टाळणे, भेसळ रोखण्यासाठी सोप्या अन्न भेसळ
ओळखणाऱ्या पद्धतींबाबत जनजागृती करणे आदींचा अंतर्भाव होतो. 'इट फोर्टीफाईड' या संकल्पनेत ॲनिमियामुक्त भारत हे
ध्येय निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये फोर्टिफाईड मीठाचा वापर वाढवणे, त्यास मुक्त बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच विविध शासकीय योजना व
कार्यक्रमांमध्ये फोर्टिफाईड अन्नपदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा
उद्देश निश्चित करण्यात आला आहे.
स्वस्थ
भारत यात्रेचे सुनियोजन केल्याबद्द्ल महाराष्ट्रातील अनुक्रमे मालवण व धुळे या दोन शहरांना 'छोटे शहर' गटात देशात उत्कृष्ट आयोजनाचा मान मिळाला आहे. मंत्री गिरीश बापट यांच्या
मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ही यात्रा व यात्रेचे विविध उपक्रम राबविले गेले.
त्यांनी या दरम्यान अधिकाऱ्यांना यात्रेसंबंधी वेळोवेळी दिशानिर्देश दिले. ही
यात्रा यशस्वी करण्यासाठी या विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा