महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे बाशीद कुरेशींना नवसंजीवनी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतच्या प्रारंभापासून ते आजपर्यंत लातूर जिल्ह्यातील ३६ हजार ७६६ रुग्णांनी विविध आजाराबाबत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त १३ रुग्णालयांतून उपचार घेतले आहेत. याकरिता ९ कोटी २४ लाख रुपयांचा निधी संबंधित रुग्णालयांना शासनाने दिलेला आहे. या योजनेची लातूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.कुलदीप शिरपूरकर व त्यांची टीम पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेत आहे. याचाच एक परिपाक म्हणून जिल्ह्यातील जवळपास ३७ हजार रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला असून यातून त्या रुग्णांचे जीवनमान सुकर झाले आहे व सर्व सामान्य रुग्णांनी मोफत आरोग्य सुविधा देण्याचं शासनाचं ध्येय साध्य होत आहे.

लातूर शहरातील भोई गल्ली भागात राहणारे बाशीद गुलाम कुरेशी हे 55 वर्षाचे सर्वसामान्य नागरिक आहेत. याच भागात ते मागील 35-40 वर्षापासून स्वत:चे हॉटेलही चालवतात. हॉटेलमधून मिळणारे उत्पन्न हे बेताचेच होते तरीही ते नेटानं हॉटेल व्यवसाय व आपल्या कुटुंबांचा रहाटगाडा हाकत होते.

पण मागील एका वर्षापूर्वी साधारणत: ऑगस्ट 2017 मध्ये बाशीद कुरेशी व त्यांच्या कुटुंबीयांवर एक संकट कोसळले. श्री.कुरेशी यांच्या छातीत अचानकपणे खूप दु:खू लागल्याने त्यांना लातूर शहरातील अल्फा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात श्री.कुरेशी यांच्या विविध तपासण्या केल्या असता तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांची ॲन्जिओग्राफी करण्याचे ठरविले.

परंतु श्री.कुरेशी यांची हॉटेल व्यवसायातील मिळकत बेताचीच असल्याने व ॲन्जिओग्राफी व त्यानंतर बायपास सर्जरीचा होणारा अडीच ते तीन लाखाचा खर्च त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप मोठा व अशक्य असा होता. पण त्यांच्या कुटुंबियांचे नातलग जावेद कुरेशी यांच्याकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती मिळालेली होती. श्री.कुरेशी यांचे कुटुंबिय त्यांच्या प्रकृतीबाबत व बायपास सर्जरीसाठी उभा करावयाच्या पैशाबाबत चिंताग्रस्त असतानाच त्यांच्या समोर अल्फा हॉस्पीटलमधील आरोग्य मित्रयेऊन उभा ठाकला व श्री.कुरेशी यांच्या कुटुंबियांना महात्मा फुले जन आरोग्य या शासकीय योजनेची माहिती देऊन त्यांना एक प्रकारचा आधार दिला. व त्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर मोफत उपचार व तेही फक्त शिधापत्रिका व एका ओळखपत्रावर मिळणार असल्याने समाधान आले. सर्वसामान्य व आर्थिंकदृष्ट‌्या कमकुवत लोकांचे  या योजनेच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवन करणे हेच शासनाचे ध्येय आहे.

अल्फा रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे श्री.कुरेशी यांची प्रथम ॲन्जिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर आठच दिवसांनी त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली. या दोन्ही सर्जरी व त्यासाठी आवश्यक औषधोपचार, तपासण्या आदी मोफत करण्यात आल्या. एवढेच नाही तर रुग्णालयात दाखल केल्यापासून श्री.कुरेशी यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांना एकही पैसा खर्च करावा लागला नाही. तर रुग्णालयातील त्यांच्या 20 दिवसातील मुक्कामात त्यांना रुग्णालयाकडून या योजनेंतर्गत दर्जेदार जेवणही विनामूल्य पुरविण्यात आले. बायपास सर्जरीनंतर श्री.कुरेशी यांना अतिदक्षता विभागातही किमान तीन-चार दिवस ठेवण्यात आलेले होते. तोही खर्च मोफत करण्यात येऊन तेथे सर्व आरोग्य सुविधाही दर्जेदार व मोफत देण्यात आलेल्या होत्या.

20 दिवसानंतर श्री.कुरेशी यांची पुनर्तपासणी करुन अल्फा रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. त्यानंतर पुढील 10 दिवसाची औषधे विनामुल्य देण्यात आली. तर रुग्णालय ते भोई गल्लीतील घरी जाण्याचे भाडेही या योजनेअंतर्गत रुग्णालयाने रोखीने दिले. या योजनेचा खरा गाभा आहे, तो म्हणजे सर्व सामान्य नागरिकांना,आर्थिकदृष्ट‌्या सक्षम नसलेल्या लोकांना जवळपास एक हजारपेक्षा अधिक आजारांबाबत सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन त्यांचे आरोग्य दर्जेदार करणे व त्या कुटुंबियांना एक प्रकारचा आरोग्यदायी दिलासा देणे.

श्री.कुरेशी यांची बायपास सर्जरी होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. जन आरोग्य योजनेमुळे श्री.कुरेशी  व त्यांच्या कुटुंबियांवर अचानकपणे ओढवलेले संकट दूर होऊन त्यांच्या जीवनात आरोग्य प्रकाश आला आहे. आज त्यांच्या  वयाच्या 55 वर्षीही व बायपास नंतरच्या एक वर्षानंतर त्यांची तब्येत अगदी ठणठणीत आहे. या योजने विषयी श्री.कुरेशी यांना बोलतं केले असता ते म्हणाले की, शासनाची ही महात्मा फुले जन आरोग्य योजना नसती तर माझ्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तीला खाजगी रुग्णालयाचा अडीच ते तीन लाखाचा खर्च पेलवला नसता.  आज या योजनेमुळे मी माझ्या कुटुंबियांसोबत आनंदी व आरोग्यदायी जीवन जगत असून  ही योजना म्हणजे माझ्यासाठी जीवनदायी ठरली आहे.

या योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल केल्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत व त्यानंतर एक वर्ष मला मोफत औषधोपचार मिळाले. रुग्णालयानेही खाजगी रुग्ण व शासकीय योजनेचा रुग्ण हा भेदभाव न करता दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरु करुन सर्वसामान्य व दुर्बल घटकांतील माझ्या सारख्या व्यक्तींना नवसंजीवनी दिल्याबद्दल त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मन:पूर्वक आभार मानले.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील सुमारे 37 हजार रुग्णांनी विविध आरोग्य सेवेचा लाभ घेतला असून बाशीद गुलाम कुरेशी हे त्यापैकीच एक लाभार्थी आहेत. व ते आपलं पुढील जीवन उत्तम पद्धतीने जगत आहेत, हेच खरं या योजनेचे यश  आहे.

- सुनील सोनटक्के

जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा