विधानपरिषद लक्षवेधी : दि. २६ नोव्हेंबर, २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीचे सर्वेक्षण करणार - डॉ. रणजित पाटील
मुंबई, दि. 26 : मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीचे सर्वेक्षण करुन बेकायदा व विनापरवाना राहणाऱ्या नागरिकांची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले.


यासंदर्भातली लक्षवेधी सूचना सदस्य हेमंत टकले यांनी मांडली होती.


यावेळी डॉ.पाटील म्हणाले, नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीत 30 ऑक्टोबर 2018 रोजीची आग सदोष विद्युत प्रणालीमुळे लागली असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे. स्थानिक पोलिसांमार्फत करण्यात आलेल्या चौकशीत, नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर वास्तव्य करुन घुसखोर बांगलादेशी नागरिक राहत नसल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. सदर झोपडपट्टीमधील अनधिकृत माळे, झोपडपट्टीलगतचे रस्ते व पदपथावरील अनधिकृत झोपडपट्ट्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी कारवाई करण्यात येते. सदर आगीमध्ये बाधित झालेल्या 204 कुटुंबांना प्रतिकुटुंब 5 हजार रुपये इतके सानुग्रह अनुदानाचे वाटप जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचेमार्फत करण्यात आलेले आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप सहभागी होते.
०००००

राजकीय व सामाजिक स्वरुपाचे खटले मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरु - दीपक केसरकर
मुंबई, दि. 26 : शासनाकडे मोठ्या प्रमाणावर राजकीय व सामाजिक स्वरुपाचे खटले मागे घेण्याच्या विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार हे खटले मागे घेण्याची कार्यवाही सुरु असल्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.


या संदर्भातली लक्षवेधी सूचना सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी मांडली होती.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले, शासनाकडे मोठ्या प्रमाणावर राजकीय व सामाजिक स्वरुपाचे खटले मागे घेण्याबाबत विनंत्या प्राप्त होत असतात. सदर विनंत्यांबाबत लोकप्रतिनिधींकडून अथवा अन्य उच्चस्तरावरुन शिफारशी प्राप्त होत असतात. अशावेळी आयुक्तालय/जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रशासनाकडून अहवाल मागविले जातात. परंतु काही प्रकरणी सदर अहवाल वेळेवर प्राप्त होत नाहीत किंवा स्थानिक प्रशासनाकडून सदर खटले मागे घेण्यात येऊ नयेत अशा शिफारशी केल्या जातात. अशा बाबतीत शासनाकडून निश्चित निर्णय होणे आवश्यक असल्याने दि. 30/8/2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या, 1973 चे कलम 321 नुसार राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्री (वित्त व नियोजन, वने) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. 


यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, डॉ. नीलम गोऱ्हे सहभागी होते.
०००००


कायदेशीर बाबी तपासून शिक्षक पात्रता परीक्षेबाबतचा (टीईटी) निर्णय - विनोद तावडे

मुंबई, दि. 26 : राज्यातील सर्व प्राथमिक शाळांतील शिक्षक पदावरील नियुक्तीकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करुन शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली आहे. याबाबतचा पुढील निर्णय कायदेशीर बाबी तपासून घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.


याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य सर्वश्री दत्तात्रय सावंत, विक्रम काळे, नागो गाणार, हरिभाऊ राठोड यांनी मांडली होती. त्यावेळी श्री. तावडे बोलत होते.


यावेळी श्री. तावडे म्हणाले, राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असलेले उमेदवार उपलब्ध असताना त्यांची नियुक्ती न करता सेवेत असलेल्या शिक्षकांना सदर पात्रता परीक्षा पात्र होण्यास मुदतवाढ दिल्याच्या कारणास्तव उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
०००००

आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेतर अंशदान निवृत्तीवेतनाबाबत नवीन लेखाशीर्ष उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु - प्रा. राम शिंदे
मुंबई, दि. 26 : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेतर अंशदान निवृत्तीवेतनाबाबत नवीन लेखाशीर्ष उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.


याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य सर्वश्री दत्तात्रय सावंत, विक्रम काळे, हरिभाऊ राठोड यांनी मांडली होती.


यावेळी प्रा. शिंदे म्हणाले, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग विभागाने मान्यता दिलेल्या व 100 टक्के अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेसाठी द्यावयाचे नियोक्त्याचे समतुल्य अंशदान तसेच कर्मचाऱ्याचे व नियोक्त्याचे जमा होणारे अंशदानावर व्याज देण्यासाठी तरतूद करण्याच्या अनुषंगाने नवीन लेखाशीर्ष उपलब्ध करुन घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा