विधानपरिषद इतर कामकाज : दि. २७ नोव्हेंबर, २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

सेवाज्येष्ठतेबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही
- शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे
मुंबई, दि. 27 : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल. यासाठी विधी विभागाचे तसेच विधान परिषदेतील शिक्षक सदस्यांची मते जाणून घेण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.


विधानपरिषद नियम 92 अन्वये सदस्य नागोराव गाणार यांनी  राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेविषयीच्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार सेवाज्येष्ठतेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे श्री. तावडे यावेळी म्हणाले.


यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
00000


केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक - दिलीप कांबळे
मुंबई, दि. 27 : राज्यातील केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक आहे. अनुदान देण्यासंदर्भातील प्रश्न हा डिसेंबरअखेरपर्यंत निकाली निघेल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितले.


विधानपरिषद नियम 92 अन्वये सदस्य सतीश चव्हाण यांनी राज्यातील अनुदानास पात्र शाळांना अनुदान देण्याविषयीची चर्चा उपस्थित केली होती. यास उत्तर देताना श्री. कांबळे बोलत होते.  गोरगरीब, मागास विद्यार्थ्यासाठी केंद्रीय आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यामुळे या आश्रमशाळांच्या अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक असल्याचे श्री. कांबळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, भाई गिरकर, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा