मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध संस्था, संघटना, मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मराठा समाज आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूरमुंबई, दि. २९ : मराठा समाजासाठी सामाजिक भावनेतून आणि ऐतिहासिक असे आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर केल्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि विधिमंडळ सदस्यांनीही अभिनंदन केले.


आरक्षण विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अथक पराकाष्ठा केल्याबद्दल विविध संघटना, संस्था तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट तसेच संदेशांद्वारे अभिनंदन केले. त्यासाठी विधानभवनातील मुख्यमंत्री महोदयांच्या कक्षात आज दिवसभर रिघ सुरू होती. राज्यातील विविध भागांतील विधिमंडळ सदस्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. विधान भवनातील समिती सभागृहात शिवसंग्राम पक्षाच्यावतीनेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.


याप्रसंगी मराठा आरक्षणासाठीच्या  मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, शिवसंग्रामचे संस्थापक तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार भारती लव्हेकर, आमदार शिरीष चौधरी, शिवसंग्रामचे राज्याध्यक्ष तानाजीराव शिंदे आदींची उपस्थिती होती. उपस्थितांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा भव्य पुष्पहार घालून तसेच पेढे भरवून सत्कार केला. यावेळी आमदार श्री. मेटे यांनी यांनी आरक्षणाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असल्याचे सांगितले.


तत्पूर्वी, विधेयक मंजुरीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची त्यांच्या कक्षात भेट घेऊन, त्यांचे आभार मानले. विधेयक मंजुरीसाठी सहकार्य करणाऱ्या सहकारी मंत्री तसेच विविध घटकांचेही त्यांनी अभिनंदन केले.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मराठा समाजासाठीचे आरक्षण आणि अरबी समुद्रात उभारण्यात येणारे भव्य स्मारक यांसाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरूच्चार करतानाच या महत्त्वाकांक्षी बाबी पूर्णत्वास आणता येत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा