प्रशिक्षणातून रोजगार संधी आणि रोजगार संधीतून उत्पन्न वृद्धीमध्ये उमेदची भूमिका महत्त्वाची - असिम गुप्ता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
महालक्ष्मी सरस-उमेद मिलाप प्रदर्शनाचे उद्घाटन 
मुंबई दि. 13 : प्रशिक्षणातून रोजगार संधी आणि रोजगार संधीतून उत्पन्नवृद्धी यामध्ये उमेदची भूमिका महत्त्वाची असल्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी सांगितले.


आज श्री. गुप्ता यांच्या हस्ते महालक्ष्मी सरस-उमेद मिलाप प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


फिकी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.13 आणि 14 ऑक्टोबर 2018 रोजी कुर्ला पश्चिम येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 11.30 ते रात्री 10 पर्यंत सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकौशल्याच्या अनेक वस्तू, उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.


महिला उद्योजकांनी तयार केलेली ही दर्जेदार उत्पादने खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी तसेच त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री. गुप्ता यांनी यावेळी केले.
श्रीमती विमला यांनी यावेळी उमेदच्या कामाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, उमेदच्या माध्यमातून आतापर्यंत 3 लाख बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. गरीब कुटुंबांना सामाजिक, आर्थिक, वित्तीय समावेशनातून सहकार्य करणे, सार्वजनिक सेवांची उपलब्धता करून देताना त्यांना शाश्वत उपजीविकेची साधने निर्माण करून देण्याचा प्रयत्न उमेदच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामध्ये स्वयंसहाय्यता समूह तयार करून त्यांचे ग्रामसंघ, प्रभाग संघ तयार करण्यात येत आहेत. उमेद मधून महिला बचतगटांना अर्थसहाय्याची व्यवस्था आहे. शिवाय बचतगटांना बँकांशी जोडून त्यांच्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठीदेखील सहकार्य करण्यात येत आहे. गटातील सदस्यांची प्रशिक्षणाच्या माध्यमातून क्षमता बांधणी केली जात आहे असेही त्या म्हणाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा