महत्वाकांक्षी योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

नाशिक दि.5 : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी योजनांतर्गत सुरू असलेली कामे फेब्रुवारी 2019 अखेर पूर्ण होण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प व विकास योजनांसदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव डी.के. जैन, अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, राहुल आहेर, विभागीय आयुक्त राजाराम माने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव पी. वेलरासू, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री  म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे पूर्ण करण्यात नाशिक जिल्ह्यात चांगले काम सुरू असून घरकुलांसाठी मागणी केलेल्या उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुले उपलब्ध करून देत राज्यातील पहिला बेघरमुक्त जिल्हा करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने करावा. त्याचबरोबर जागेच्या उपलब्धतेअभावी कुठेही घरकुल अपूर्ण राहणार नाही यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.


या योजनेतंर्गत जिल्ह्याने गेल्या तीन वर्षात राज्यात सर्वाधिक 23 हजार 68 घरकुलांची कामे पूर्ण केली असून सन 2022 पर्यंत 30 हजार अतिरिक्त घरकुलांच्या उद्दिष्टांची मागणी शासनाकडे केली असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर नागरी भागातही अतिक्रमित जागांवरील घरकुले नियमित करताना प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.


जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे पूर्ण करताना कामांचा दर्जा राखण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व सबंधितांना दिल्या. जलयुक्त शिवार अभियांनतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून 2018-19 मधील कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने  करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात 36 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या योजनेंतर्गत काढण्यात आलेला गाळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्यासाठी संबंधित विभागाने योजना तयार करावी. या योजनेंतर्गत राज्यात अनेक सेवाभावी संस्था काम करण्यास तयार असून या संस्थांच्यामार्फत राज्यात 10 हजार कामे करण्यात येणार आहेत, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.


मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल व राष्ट्रीय पेयजल योजनेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. ते म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात तालुकानिहाय सुरु असलेल्या योजनांची माहिती एकत्रित करून या योजना पूर्ण करण्याचा प्राधान्यक्रम ठरवावा. तसे करताना सुरगाणा, पेठ व इगतपरी तालुक्यातील कामे लवकरात लवकर पूर्ण होईल, याचे नियोजन करावे.


अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा  लाभ खऱ्या गरजूंना मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करावे.  अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत असणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांचे शिक्षण व परिक्षा शुल्क त्यांच्या खात्यात लवकरात लवकर कसे जमा होईल याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे निवडताना अति ग्रामीण भागातील रस्ते निवडावेत. या योजनेंतर्गत रस्त्याचे जाळे तयार करतांना रस्त्यांचा दर्जा राखला जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात ठक्कर बाप्पा योजना, लोकशाहीर ण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना व अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्तीचा विकास करणे या योजनांच्या माध्यमातून सुरू असलेली अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत प्रथम प्राधान्यातील प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सचना त्यांनी दिल्या. रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मुद्रा बँक योजनेतर्गत कर्ज देताना नव्याने व्यवसाय सुरु करणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे आणि  पात्र लाभार्थ्यास कर्ज देताना कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले. 

पावसाच्या लांबणीमुळे पिकांची पाहणी करताना तलाठी,कृषि सहायक व गामसेवक यांनी संयुक्तरित्या प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल तयार करण्याच्या सचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात सुरु असलेले महत्त्वाचे विविध प्रकल्प व विकासकामांच्या माहितीचे सादरीकरण जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा