बायोमेट्रीक पद्धतीने ओळख पटवूनच तूरडाळीचे वितरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 1 - यापूर्वीच जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानात पुरवठा केलेली तूरडाळ शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रीक पद्धतीने ओळख पटवूनच रु. 35/- प्रति किलो या दराने विक्री करण्यात येत आहे. मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रांतर्गत येणाऱ्या दुकानांनी आतापर्यंत सुमारे 39 हजार 873 क्विंटल इतक्या तूरडाळीची मागणी नोंदविली आहे. त्यापैकी 2532 अधिकृत शिधावाटप दुकानांमध्ये 41.11 टक्के म्हणजेच 16 हजार 392.49 क्विंटल तूरडाळ आवक झलेली आहे. आवक झालेल्या तूरडाळीपैकी 11 हजार 15.99 क्विंटल म्हणजेच 97.30 टक्के तूरडाळीची विक्री ऑनलाईन (E- POS) मशीनद्वारे आधार क्रमांक पडताळणी करुन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेली आहे. तर  305.02 क्विंटल तूरडाळ म्हणजे 2.70 टक्के तूर डाळ ऑफलाईन पावती देऊन वितरण केलेली आहे. अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी दिली आहे. वृत्तपत्रांमध्ये सातत्याने दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती देणारे वृत्त प्रकाशित होत आहे या पार्श्वभूमीवर याबाबतची सविस्तर माहिती एका पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.


ऑगस्ट महिनाअखेर अखेर एकूण 4295 अधिकृत शिधावाटप दुकाने (मेन+एन पार्ट+ उपकेंद्र) कार्यरत आहे. एकूण अधिकृत शिधावाटप दुकानांपैकी 4169 अधिकृत शिधावाटप दुकानांनी एकूण 39 हजार 873.08 क्विंटल इतकी तूरडाळीची मागणी मार्केटिंग महाराष्ट्र फेडरेशन को. ऑप. लि., मुंबई यांचेकडे नोंदविलेली असून त्याची रक्कम रुपये 12,36,21,151 (बारा कोटी छत्तीस लाख एकवीस हजार एकशे एक्कावन फक्त) इतकी वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडे जमा केलेली आहे.  उर्वरित 126 अधिकृत शिधावाटप दुकानांनी तूरडाळीची मागणी केलेली नाही.  मागणी नोंदविलेल्या एकूण 4169 दुकानांपैकी 2532 दुकानात तूरडाळीचा पुरवठा झाला असून 1637 अ.शि.वा. दुकानात तूरडाळीचा पुरवठा झालेला नाही.  पुरवठा केलेली तूरडाळ शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या मागणीनुसार दुकानामध्ये असलेल्या ई-पॉस (EPOS) मशिनद्वारे आधारक्रमांक पडताळणी करुन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे वितरित करण्यात येते.  ज्या शिधापत्रिकाधारकांची आधार सीडिंग झालेले नाही त्यांना पावतीद्वारे वितरण करण्यात येत आहे.

अधिकृत शिधावाटप दुकानदार तूरडाळीच्या नियतनानुसार मागणीचा धनाकर्ष परिमंडळ कार्यालयामार्फत वित्तिय सल्लागार व उपसचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडे जमा करतात. त्याअनुषंगाने परिमंडळ कार्यालय वाहतूक ठेकेदारास तूरडाळ मागणीबाबतचे पत्र देतात.  तद्नंतर वाहतूक ठेकेदार महाराष्ट्र स्टेट को.ऑप.मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई यांचेकडून तूरडाळीची उचल करतात.  सदर उचल केलेली तूरडाळ अधिकृत शिधावाटप दुकानदारांच्या नियतनानुसार व मागणीनुसार संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानदारांना पुरवठा केली जाते.

गेल्या काही दिवसांत काही निवडक दैनिक, वृत्त वाहिनींवर प्रसिध्द झालेल्या बातमीमध्ये नमूद घटनास्थळ परिमंडळांतर्गत शिधावाटप कार्यालय क्र. 30 ई भांडुप या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असल्याने तसेच घटनास्थळी आढळून आलेल्या रिकामे पाकीटावरील बॅच क्र.07/24 सह इतर पुरवठा झालेली तूरडाळ शिधावाटप कार्यालय क्र.30/ई भांडूप कार्यालयांतर्गत अधिकृत शिधावाटप दुकानांमार्फत विक्री करण्यात आलेली सर्व 100% तूरडाळ ई-पॉस (e-POS) मशिनद्वारे आधार पडताळणी करुन (स्वत: ग्राहक दुकानात येवून pos मशीनवर आधारक्रमांकाची पडताळणी करुन स्वत: अंगठा उमटवून उचल केलेले धान्य) करुन शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन विक्री करण्यात आलेली आहे. तसेच शिधावाटप कार्यालय क्र.45/ई विक्रोळी अंतर्गत शिधावाटप दुकानांमार्फत विक्री करण्यात आलेल्या तूरडाळींपैकी 95% तूरडाळ ई-पॉस (epos) मशिनद्वारे आधार पडताळणी (स्वत: ग्राहक दुकानात येवून pos मशीनवर आधारक्रमांकाची पडताळणी करुन स्वत: अंगठा उमटवून उचल केलेले धान्य) करुन शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन विक्री करण्यात आलेली आहे. व उर्वरित 5% तूरडाळ ऑफलाईन पावतीद्वारे विक्री करण्यात आलेली आहे.

या ऑनलाईन व ऑफलाईन विक्री झालेल्या तूरडाळीच्या शिधापत्रिकाधारकांची ऑनलाईन 475 व ऑफलाईन 1697 घरभेटी देऊन पडताळणी केली असता ऑनलाईन या सर्वांना पावतीनुसार तूरडाळ प्राप्त झालेली असल्याचे आढळून आले.  ऑनलाईन विक्रीचा लाभार्थी व स्वस्तधान्य दुकाननिहाय संपूर्ण तपशील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या www.mahafood.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवा या Tab मधील ऑनलाईन रास्तभाव दुकाने यावर उपलब्ध आहे.

मुंबई येथील अन्य काही वर्तमानपत्रात मिरा-भाईंदर विभागातील प्रसिध्द झालेल्या बातमीच्या अनुषंगाने घटनास्थळी संकलित केलेल्या पिशव्यांवरील बॅच क्र. ssc-157 माहे जून 2018 असा आहे. तथापि, मीरा-भाईंदर शिधावाटप कार्यालयास शिधावाटप दुकाननिहाय माहे दि.27.08.2018 अखेर एकूण 20 अधिकृत शिधावाटप दुकानांत एकूण 320 क्विंटल तूरडाळीचा पुरवठा झाला असून पुरवठा करण्यात आलेली डाळ ही बॅच क्र. ssc-200जुलै,2018 व ऑगस्ट,2018 ssc-223 द्वारे प्राप्त झालेली आहे.  त्यापैकी 164.30 क्विंटल ऑनलाईन ई-पॉस(e-pos) मशिनद्वारे आधार पडताळणी  करुन (स्वत: ग्राहक दुकानात येवून pos मशीनवर आधारक्रमांकाची पडताळणी करुन स्वत: अंगठा उमटवून उचल केलेली) व 40.74 क्विंटल ऑफलाईन तूरडाळीची विक्री झालेली असून, उर्वरित तूरडाळ वितरणाकरिता लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

तसेच हा क्रमांक असलेली तूरडाळ ही कोणत्या विभागात पुरवठा करण्यात आली आहे.  याबाबत व्यवस्थापक, महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई, यांचेकडे विचारणा केली असता, त्यांनी बॅच क्रमांक ssc-157 पिशव्यांमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर यांना शासकीय गोदाम, जव्हार व विक्रमगड येथे प्रत्येकी 10 मे. टन अशी एकुण 20 मे. टन तूरडाळीचा पुरवठा करण्यात आलेला असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.  त्यानुसार विविध वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या बातम्यांमध्ये आढळून आलेल्या तूरडाळीच्या रिकाम्या पिशव्यावरील बॅच क्रमांकानुसार सदरची तूरडाळ जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वितरीत झाल्याचे दिसून येत असल्याने सदरचे प्रकरण पुढील चौकशीकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर यांचेकडे पाठविण्यात आले आहे.

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रांतर्गत अधिकृत शिधावाटप दुकानांत मागणी केलेल्या तूरडाळीपैकी एकूण आवक 16392.49 क्विंटल असून त्याची टक्केवारी 41.11 टक्के इतकी आहे.  त्यापैकी 11321.01 क्विंटल विक्री झाली असून त्याची टक्केवारी ही 69.06 टक्के इतकी आहे.  एकूण विक्रीपैकी ऑनलाईन विक्री 11015.99 असून त्याची टक्केवारी 97.30 टक्के आहे.  तसेच ऑफलाईन विक्री 305.02इतकी असून त्याची टक्केवारी 2.70 टक्के इतकी आहे.  मागणी केलेल्या 4169 दुकानापैकी 1637 दुकानामध्ये तूरडाळ प्राप्तच झाली नसून त्याची टक्केवारी 39.27 टक्के इतकी आहे.

मुंबई-ठाणे शिधावाटप कार्यक्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचा काळाबाजार होऊ नये याकरिता बायोमेट्रिक पध्दतीने ओळख पटवून शिधाजिन्नसाचे वितरण या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करुन कोणताही लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही व अन्नधान्याची जादा दराने विक्री केली जाणार नाही तसेच शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नसाची विक्री केल्यानंतर पावती देण्याबाबतच्या निर्देश परिपत्रकाद्वारे सर्व परिमंडळ कार्यालयास निर्गमित करण्यात आलेले आहे.  तसेच जे अधिकृत शिधावाटप दुकानदार या आदेशाची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्या विरुध्द जिवनावश्यक वस्तू कायदा 1955 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

काही वृतपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीनुसार चौकशीअंती मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रांतर्गत महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि., मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या तूरडाळीमध्ये कोणताही घोटाळा अथवा अनियमितता झालेली नाही. असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा