लातूर, दि.३० :- जलयुक्त
शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात जलसंवर्धनाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. आता
भारतीय जैन संघटना आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नातून लातूर-उस्मानाबाद
जिल्ह्यातून दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार, भूकंपग्रस्तांच्या
नव्याने निर्माण झालेल्या समस्या सोडविणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज किल्लारी येथे दिला.
महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना
यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त
करण्याच्या निर्धार समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे
पालकमंत्री अर्जुन खोतकर, खासदार डॉ.सुनील गायकवाड, खासदार, प्रा. रविंद्र गायकवाड, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी
मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री डॉ.पदमसिंहजी पाटील, माजी
मंत्री तथा आमदार मधुकरराव चव्हाण,
आमदार सर्वश्री. अमित देशमुख, बसवराज पाटील,
सर्वश्री आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्र्यंबक
भिसे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील,
सुरजितसिंह ठाकूर, विक्रम काळे, सुरेश धस, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, उस्मानाबाद
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, माजी खासदार
गोपाळरावजी पाटील, जनार्धन वाघमारे, रुपाताई
निलंगेकर, कल्पना नरहिरे, मुख्यमंत्री
कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय
आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव
एकनाथ डवले, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे , मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, संजय कोलते, लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, उस्मानाबादचे
पोलीस अधीक्षक आर. राजा उपस्थित होते .
प्रारंभी मुख्यमंत्री श्री.फडणवीस, माजी
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील व इतर मान्यवरांनी भारतीय जैन
संघटनेकडून जलयुक्त शिवारच्या कामासाठी
देण्यात येणाऱ्या मशीनचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप
प्रज्वलन करुन निर्धार समारंभाची सुरुवात झाली.
१९९३ मध्ये झालेल्या भूकंपाला आज
पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून या वेळी आपलं सर्वस्व गमावलेल्या लोकांसोबत संवेदना
व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्या आपत्तीच्या परिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री
शरद पवार व जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी यांनी चांगले काम केले होते, असे
श्री. फडणवीस यांनी सांगितले. त्यावेळी पुनर्वसनाचे मोठे काम करण्यात आले. परंतु
त्याबाबतचे काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यापैकी कुटुंबामध्ये झालेल्या
वाढीव सदस्यांमुळे त्यांना आवश्यक असेल तर घर किंवा जागा देण्यात येईल त्याचबरोबर
त्यावेळी पुनर्वसनासाठी जमिनी दिलेल्या लोकांनाही जागा अथवा इतर मदत देण्याची
घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात पाणीपुरवठ्याच्या विविध योजना
राबविल्या जात होत्या, या भागाचे पुनर्वसन होत असतानाही
येथेही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरू केला परंतु काही कारणांनी
या योजना बंद झाल्या. त्या सर्व योजना पुन्हा सौरऊर्जेच्या मदतीने कार्यान्वित
करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पंचवीस वर्षांपूर्वी जिल्ह्यात
झालेल्या भूकंपामुळे अनेक गावात पुनर्वसनाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली .
या गावांपैकी काही कामे प्रलंबित आहेत.पुनर्वसनानंतर अजूनही काही प्रश्न शिल्लक
आहेत. त्यातील या भागातील ज्या कुटुंबांना आवश्यक असेल त्या कुटुंबांना घर अथवा
प्लॉट देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली . तसेच
या भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत . त्या या सोलापूरच्या सोलर
उर्जेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्याची घोषणाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील
नदी, नाले, तलाव, धरणातील गाळ काढणे व इतर जलसंधारणाची कामे वैज्ञानिक पद्धतीने केल्यास
कमीत कमी पावसातही गावे जलपरिपूर्ण होऊ शकतात. मागील वर्षी बहुतांश ठिकाणी कमी
पाऊस झाला परंतु जलयुक्तच्या कामांमुळे पिकांना संरक्षित सिंचन मिळाल्याने
उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. या कामांमुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पाणी
पातळीत किमान चार मीटरने वाढ झालेली आहे तर या भागातील टॅंकरची संख्या ८५ टक्क्याने
कमी होऊन टंचाईग्रस्त गावांची संख्याही ७५ टक्क्यांनी कमी झाली आहे.
श्री.फडणवीस म्हणाले की,भारतीय
जैन संघटनेच्या सहकार्याने उस्मानाबाद व लातूर या दोन्ही जिल्ह्यात जलसंधारणाची
कामे करून या जिल्ह्यातील गावे जलयुक्त व दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले .कायमस्वरूपी दुष्काळमुक्तीचा निर्धार करताना या भागातील
शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला पाहिजे ,उसाचे पीक
महत्त्वाचे असले तरी इतर पिकांचाही विचार
झालाच पाहिजे तरच गावे दुष्काळमुक्त होतील. किल्लारी येथील कारखानाही लवकरच सुरू
होईल असे सांगून पालकमंत्री निलंगेकर यांनी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या
माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या काही भागात केलेल्या जलसंधारणाच्या कामाचे कौतुक केले.
श्री.फडणवीस यांनी राज्य शासनाच्या
जलसंधारणाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून या जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी
केली जाईल तसेच भारतीय जैन संघटनेच्या दुष्काळमुक्तीच्या कामात शासन, प्रशासन
व लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल असे सांगितले तर सद्यस्थितीमध्ये पावसाअभावी पुन्हा
दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे परंतु शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविक करताना मागील चार-पाच
वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. येथील भूकंपाने एक पिढी नष्ट केली तर दुसरी
पीढी उद्ध्वस्त होऊ नये म्हणून किल्लारी गावातील निराधार मुलांना भारतीय
जैन संघटनेमार्फत पुणे येथे पुढील
शिक्षणासाठी नेण्यात आले,
त्यांना चांगले शिक्षण मिळाल्याने आज ते शासकीय तसेच विविध
क्षेत्रात यशस्वी झाले आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष
शांतीलाल मुथा यांनी दिली. लातूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यात
जलसंधारणाची विविध कामे पूर्ण करुन हे
दोन्ही जिल्हे दुष्काळमुक्त
करण्याचा निर्धार भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. १५ जून २०१९ पर्यंत हे जिल्हे दुष्काळमुक्त करण्यासाठी
आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी
सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त
मुख्य सचिव तसेच लातूर जिल्हयाचे
तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी
यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना संकट काळात समाजाची त्या संकटांना सामोरे
जाण्याची शक्ती वाढविण्याची गरज आहे. लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपाने
संकटकाळात त्यावर मात करण्याची शक्ती वाढविण्याबरोबरच माझ्या आयुष्यातही खूप काही
शिकण्याची संधी मला मिळाली, असे सांगून त्यांनी शासन व
प्रशासनाने भूकंपानंतरच्या काळात केलेल्या कामांची तसेच आपत्तीव्यवस्थापनासंबंधी
राबविलेल्या विविध उपाययोजनांची माहिती
दिली.
लातूर,उस्मानाबाद या
जिल्ह्यात २५ वर्षापूर्वी भूकंपाने मोठं नुकसान झालं पण लोकांनी उभारी घेतली.
राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरु करून
राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला व कामात आमचाही पूर्ण सहभाग आहे
व येथून पुढेही राहील असे आमदार बसवराज पाटील यांनी सांगितले.
लातूर व उस्मानाबाद या दोन्ही
जिल्ह्यात भारतीय जैन संघटना व
महाराष्ट्र सेना यांच्यामार्फत जलसंधारणाची विविध कामे करून पाणी अडविणे व जिरविणे
ही कामे होणार असल्याने हे दोन्ही जिल्हे
दुष्काळमुक्त होऊन जलपरिपूर्ण
होतील, असा विश्वास व्यक्त करुन
उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर
यांनी शांतीलालजी मुथा यांना जलयुक्त
शिवार मधील मानद डॉक्टरेट पदवी दयावी असे सूचविले.
लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील
निलंगेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पंचवीस वर्षांपूर्वी
येथे झालेल्या भूकंपाने भयानक परिस्थिती निर्माण झालेली होती. या संकटावर मात
करण्यासाठी विविध संघटनांनी येथे कार्य केले त्यातील बीजेएस या संघटनेनेही येथील बाराशे विद्यार्थ्यांना
पुणे येथे नेऊन तेथे त्यांचे शिक्षण पूर्ण
करुन त्यांचे पुढील जीवन सुकर केले, असे कौतुकाने म्हणाले.
ते पुढे म्हणाले, नुकताच मराठवाड्याने आपला ७० वा मुक्तीदिन साजरा केला. मागील ७० वर्षाच्या
काळातही मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या भागावर त्याकाळी निजामाचे संकट, भूकंपाचे
संकट त्यानंतर मागील तीन-चार वर्षांपासून पाण्याचे संकट अशी विविध संकटे येत
आहेत. सन २०१६ साली या भागात रेल्वेने
पाणी आणावे लागले. लातूर जिल्ह्यात
साडेसहाशे टँकरची संख्या होती.
मराठवाड्याच्या इतर
जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टँकरची संख्या होती.
परंतु मागील तीन-चार वर्षात लातूर
जिल्हा व मराठवाड्यात झालेल्या जलयुक्तच्या
कामांमुळे या भागातील टँकरची संख्या लक्षणीय कमी झाली असून लातूर जिल्हा टँकरमुक्त
झालेला आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
आजही मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यातील
पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे व या भागात
दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे. या भागात जवळपास 70
टक्के सोयाबीनची लागवड होते, परंतु हे पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेलेले आहे. त्यामुळे या भागावर दुष्काळाची छाया पडलेली
दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी या बाबीचा
विचार करावा, अशी विनंतीही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी
मुख्यमंत्र्यांना केली. तसेच मराठवाड्यासाठी
समृद्धी महामार्ग हा वरदान ठरलेला आहे. हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातून
जात आहे परंतु हा महामार्ग औरंगाबाद येथून बेंगलोर -हैदराबादकडे जर करण्यात आला तर
या भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल
त्याबाबतचाही विचार व्हावा अशी
मागणीही त्यांनी केली.
पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेल्या कामाला जनता कधीही विसरणार नाही, असे
माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील
-चाकूरकर यांनी सांगून अडचणीच्या
काळात सर्वजण जात-धर्म पक्षभेद
विसरून एकत्रपणे काम करतात ते या
भूकंपाच्या वेळी दिसून आले. भूकंपाची आपत्ती आली
त्यावेळी देशात व राज्यात आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण अस्तित्वात नव्हते.
परंतु या भूकंपामुळे देशपातळीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची
स्थापना झाली, अशी माहिती त्यांनी
दिली. मानवी जीवनासाठी हवा, पाणी, अन्न हे महत्वाचे घटक असून
जलसंधारणाच्या या कार्यास सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे , असे आवाहन त्यांनी
याप्रसंगी केले.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी
आपल्या मनोगतात ३० सप्टेंबर १९९३ रोजी
झालेल्या भूकंपाची माहिती घेतल्यानंतर
तातडीने सकाळी सात वाजता किल्लारी येथे पोहोचलो .यावेळी प्रथम काम केले ते
मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा अंत्यविधी करणे व दुसरे काम केले ते जखमी लोकांना
तत्काळ उपचार मिळवून देणे , अशा
आठवणी सांगितल्या.या घटनेचे गांभीर्य
ओळखून स्वत: येथे उपस्थित राहून येथील मदतकार्याच्या कामाला शिस्त लावली. त्यानंतर
दहा दिवसात येथील लोकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून एका महिन्याच्या आत
सर्वांना शेडचे घर उपलब्ध करून दिले. भूकंपाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी
शासनाने व इतर संघटनांनी जेवढी मदत केली तेवढेच मदतकार्य या भागातील लोकांनीही
केले होते . या धक्क्यातून बाहेर पडण्याचे काम याच लोकांनी केल्याची माहिती
श्री.पवार यांनी दिली.
श्री.पवार यांनी सांगितले, या
घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या या भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी मुंबईवरून
राज्यातील इतर तीस-पस्तीस मानसोपचारतज्ज्ञाची टीम तेथे सतत तीन महिने कार्यरत
होती. यावेळी केंद्र शासन व जागतिक बँकेने मोठे आर्थिक सहकार्य केले. गावच्या
सरपंचांनी कसे काम करावे, हे तत्कालीन किल्लारीचे सरपंच
असलेले शंकरराव पडलेकर यांच्या कामाकडे पाहिल्यावर लक्षात येते. शेवटी श्री.पवार
यांनी राज्य शासन व भारतीय जैन संघटना उस्मानाबाद व लातूर या दोन जिल्ह्यात
जलसंधारणाचे काम हाती घेत आहे. हे काम करण्यापूर्वी त्यांनी जलतज्ञांचा सल्ला
घ्यावा व नंतरच कामाला सुरुवात करावी, असे सांगून या कामात
सर्वांचे सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
भूकंप झाल्यानंतर या भागातील निराधार
बाराशे विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटनेने त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी
पुणे येथे नेले,त्यांचे पूर्ण पालकत्व स्वीकारले, त्याबाबतची
चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
यावेळी भारतीय जैन संघटना व
त्यांचे पदाधिकारी तसेच किल्लारी
ग्रामपंचायतीच्या सरपंच शैलाताई लोहार व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपस्थित इतर
मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व फोटो फ्रेम देऊन सत्कार केला. या समारंभाचे सूत्रसंचालन
सुनील कोचेटा व प्रकाश दगडे यांनी केले तर
आभार अभय शाह व किल्लारी गावचे उपसरपंच
अशोक पोतदार यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा