माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक मुंबईत करणार- मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबईत झालेल्या श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी दिला अटलजींच्या आठवणींना उजाळा

मुंबई, दि. २२ : भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी देशासाठी जगले. प्रधानमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम अजोड होते. त्यांच्या कार्यातून आणि व्यक्तिमत्वातून प्रेरणा मिळावी यासाठी अटलजींचे भव्य स्मारक मुंबई येथे उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

एन.सी.पी.ए.च्या सभागृहात झालेल्या श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यमंत्री मंडळातील सदस्य, खासदार, आमदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अटलजींच्या आठवनींना उजाळा देत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आलेख मांडला. राष्ट्रहिताला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. राष्ट्र विकासाच्या मुद्यावर अटलजींनी कधीही सत्ताधारी किंवा विरोधक असा विचार केला नाही. त्यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या काळात अनेक योजनांपैकी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना प्रभावी ठरली, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अटलजींनी ही योजना तयार केली. त्यांनी रस्ते विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. कारण रस्ते हे केवळ दळणवळणाचे साधन नसून ते शिक्षण, आरोग्याचे अनेक गावांसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करतात.संत तुकाराम महाराजांनी हेची दान देगा देवा’... या अभंगातून जी भावना व्यक्त केली होती, त्याचप्रकारे अटलजींनी मै जी भर जिया.. मै मन से मरूया दोन ओळींच्या कवितेतून मांडली होती, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कवी अटलजींचे शब्दचित्र यावेळी रेखाटले. अटलजी अनंत आहेत, त्यांचे विचार कधीच संपणारे नाहीत. ध्येयवाद, देशाबद्दलचे प्रेम काय असते हे त्यांच्याकडे पाहून शिकायला मिळाले. अटलजी खऱ्या अर्थाने अटल होते, अविचल होते. अटलजी आज नसले तरी त्यांचे विचार अनंत आहेत. ते विचारांचे पक्के होते, त्यांची विचारांवर अमिट अशी श्रद्धा होती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली.

अटलजींनी सुवर्ण चतुष्कोन योजनेतून भावनिक एकात्मतेबरोबरच भौतिक एकात्मतेची जोड दिली. त्यांच्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात सर्वात जास्त रोजगार निर्मिती झाली होती. देशाच्या मातीशी अटलजी जोडले गेले होते. त्यांना विकासाची मानके माहित होती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अटलजींना आदरांजली वाहिली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी अटलजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडणाऱ्या आठवणी सांगितल्या. 

अटलजींनी त्यांचे जीवन देशासाठी अर्पण केले. मी वेळोवेळी त्यांच्या सल्ल्यानुसारच माझ्या कार्याची दिशा ठरवित असे. माझ्यासाठी ते प्रेरणापुरूषच होते, अशा शब्दात उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, अटलजींना संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास माहित होता. त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या सभा प्रचंड गर्दी खेचत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री असताना सैन्यातील शहिदांच्या परिवाराला पेट्रोल वाटपाच्या योजनेला त्यांनी तत्काळ मंजुरी दिली. 1947 च्या स्वातंत्र्यानंतर दादरा-नगर हवेली मुक्तीच्या लढ्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, असे सांगून अटलजीसोबत केलेल्या कार्याच्या अनेक आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अटलजींच्या कार्यावर तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. अटलजींचे मुंबईत आणण्यात आलेले अस्थिकलश महाराष्ट्रातील नद्यांमध्ये विसर्जित केले जाणार असून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते हे अस्थिकलश त्या-त्या जिल्ह्यातील पालकमंत्री आणि पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा