घारापुरी बेट व इगतपुरी वेलनेस हब ठरणार पर्यटकांचे आकर्षण - पर्यटनमंत्री जयकुमार रावल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नवी दिल्ली : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध घारापुरी बेट व नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी  वेलनेस  हबला देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभाग कार्यरत असून, ही स्थळे पर्यटकांचे खास आकर्षण ठरतील, असा विश्वास राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केला. 

श्री.रावल यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री.रावल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान, श्री.रावल यांनी पर्यटन विभागाच्यावतीने  सुरु असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.
                                    

घारापुरी बेटांवर ८ जून रोजी पर्यटकांचा महाकुंभ 
पर्यटन विभागाच्यावतीने नव-नवीन पर्यटन स्थळे विकसित करून ते जगासमोर मांडण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत.  या उपक्रमांतर्गत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या घारापुरी बेटाला देश-विदेशातील पर्यटकांसमोर मांडण्यासाठी ८ जून २०१८ रोजी विशेष आयोजन करण्यात आल्याचे श्री. रावल यांनी सांगितले. राज्य शासनाच्या प्रयत्नाने घारापुरी बेटावर नुकतीच वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्यावतीने पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेटावरील जगप्रसिद्ध एलिफंटा गुंफा येथील समुद्र, पहाड, जंगल आदींचा पर्यटकांना आनंद घेता यावा व या बेटांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देण्यासाठी एअर बीएनबीया जगविख्यात कंपनी सोबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सामंजस्य करार केला आहे. याचाच भाग म्हणून  ८ जून २०१८ रोजी घारापुरी बेटावर देश -विदेशातील  पर्यटकांसाठी पर्यटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


इगतपुरी येथे वेलनेस हब 
देश-विदेशातील पर्यटकांना एकाच ठिकाणी आयुर्वेद, युनानी, योगा,रेकी,ॲक्युप्रेशर आदी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्हयातील इगतपुरी येथे वेलनेस हब उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री.रावल यांनी दिली. पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने १०० एकरावर हे वेलनेस हबउभारण्यात येणार असून यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्राकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री.रावल यांनी वाहिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त श्री.रावल यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकरकांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा