शैक्षणिक सुधारणांमुळे राज्य देशात तिसऱ्या स्थानावर - विनोद तावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



नाशिक, दि. ३१:- राज्यात राबवण्यात आलेल्या शैक्षणिक सुधारणांमुळे महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहे असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शिक्षणाची वारी कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणमंत्री श्री. तावडे बोलत होते.

श्री. तावडे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी सुरुवात केलेल्या शैक्षणिक सुधारणांचा चांगला परिणाम दिसत आहेत. यापूर्वी आपण देशात सोळाव्या स्थानावर होतो. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाची अंमलबजावणी चांगल्या रितीने होते आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीना काही कौशल्य दडलेले असते ते शोधण्याची गरज आहे. यामुळे शालांत परीक्षेत अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निकालानंतर लगेचच पुन:परीक्षा घेणे, गुणपत्रकावर नापास हा शेरा टाकण्याच्या ऐवजी इलिजिबल फॉर स्कील डेव्हलपमेंट’ (कौशल्य विकासासाठी पात्र) शेरा देणे असे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले.

ते म्हणाले, शाळांमधील शैक्षणिक सुधारणांमुळे 25 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमधून काढून मराठी शाळांमध्ये पाठविण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षकांना टेक्नोसॅव्ही बनविल्यामुळे 1 लाख 21 हजार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवताना तंत्रज्ञानाचा चांगला वापर करुन कर्तृत्वासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग केला आहे. शिक्षकांवरील शाळाबाह्य कामाचा ताण कमी व्हावा यासाठी निवडणूक कामांमधून वगळण्यात यावे असे निर्देश देण्यात आल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


त्यांनी शिक्षकांमध्ये जाऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. तसेच सुचविण्यात आलेल्या नवीन संकल्पनांचा शासनाच्या धोरणांमध्ये समावेश करण्यात  येईल असेही सांगीतले.

शिक्षणाची वारी कार्यक्रमासाठी शिक्षण पद्धतीमध्ये राबवलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे, उपक्रमांचे 55 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री श्री.तावडे यांनी स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली. शिक्षणाची वारी कार्यक्रमांतर्गत 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत नाशिकसह विविध जिल्ह्यांमधील शिक्षक सहभागी होणार आहेत. यामध्ये पालघर, ठाणे, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, मुंबई, मुंबई उपनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे.


कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, नरेंद्र पवार, शिक्षण संचालक सुनिल मगर, उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, नितीन उपासनी तसेच प्रदीप पेशकार, संदीप झा आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा