रिक्षा, टॅक्सींचे दरसूत्र निश्चित करण्यासाठी १५ मेपर्यंत ऑनलाईन मते नोंदवावीत - बी. सी. खटुआ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 29 : राज्यातील रिक्षा- टॅक्सींचे प्रवासभाडे ठरविणे, त्यांचे टप्पे काय असावेत हे ठरविणे यासह वाहतुकीचा दर्जा आदी बाबींसंदर्भात ऑनलाईन सर्वेक्षण घेण्यात येत आहे. त्यात सहभागी होऊन  ग्राहक, टॅक्सी चालक, रिक्षा चालक आणि रिक्षा - टॅक्सी संघटनांनी येत्या १५ मेपर्यंत आपली मते नोंदवावीत, असे आवाहन रिक्षा-टॅक्सीचे भाडेसूत्र ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष बी. सी. खटुआ यांनी आज येथे केले.

आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, समितीचे सदस्य व माजी परिवहन आयुक्त दिलीप जाधव उपस्थित होते.   

श्री. खटुआ म्हणाले की, रिक्षा-टॅक्सीचे दरसूत्र निश्चित करण्यासाठी  मते मागविण्यात येत असून त्यांचे विश्लेषण करून शासनाला साधारण जून २०१७ अखेर अहवाल सादर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. ग्राहक, टॅक्सी चालक, रिक्षा चालक आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांनी आपली मते नोंदवून हे सर्वेक्षण जास्तीत जास्त चांगले होण्यासाठी माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी यांचे दरसूत्र ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन रिक्षा, टॅक्सीचालक, संघटनांची मते तसेच ग्राहक प्रतिनिधींची मते घेतली आहेत. पण हे सर्वेक्षण अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी समितीने व्यापक प्रमाणावर रिक्षा चालक, टॅक्सी चालक, त्यांच्या संघटनांना तसेच जनतेला त्यांची मते समितीकडे मांडण्यासाठी ऑनलाईन सर्व्हेक्षण करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार www.transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध्‍ा करून देण्यात आले आहे. 15 मे पर्यंत हे अर्ज भरून दिल्यानंतर समिती त्याचे विश्लेषण करून शासनाकडे अहवाल पाठविणार आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांना चांगले उत्पन्न मिळण्याबरोबरच ग्राहकांना आरामदायी आणि किफायतशीर दरात सेवा मिळावी यादृष्टीने दर ठरविण्यासाठी हे सर्वेक्षण उपयोगात  येणार आहे. सेवेचा दर्जा उंचावण्यासाठीही या सर्व्हेक्षणाचा उपयोग होणार आहे.


परिवहन आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की,  रिक्षा, टॅक्सी हे कायद्याने नियंत्रित केलेली वाहतूक साधने आहेत. आधी परिस्थिती वेगळी होती, पण आता ॲग्रीग्रेटर आले, इलेक्ट्रीकल रिक्षांचे अर्ज आलेले आहेत. नजिकच्या काळात त्या सुरू होतील. त्या पार्श्वभूमीवर काळानुरूप दर बदलण्याची गरज असते.  नागरिक हा या प्रक्रियेत महत्वाचा घटक असल्याने त्यांच्यासह रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि युनीयनची मते मागविली आहेत. अर्ज वेबसाईटवर अपलोड केले असून ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये उपलब्ध्‍ा आहेत. नागरिकांच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर समितीला त्यांच्या नेमक्या भावना समजणार आहेत. त्याचे विश्लेषण करून समिती अहवाल सादर करेल. वाहतुकीचा दर्जा आणि दर्जानुसार दर या दोनही बाबींचा यात विचार होणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणात जास्तीत जास्त लोकांनी आपली मते नोंदवावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा