वाकुर्डे प्रकल्पासाठी 200 कोटीचा निधी दोन-तीन टप्प्यात देऊन उर्वरित कामे मार्गी लावणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

 चांदोली पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी 15 दिवसात विशेष बैठक   सांगली, दि. 31 : शिराळा आणि वाळवा तालुक्याला वरदान ठरणाऱ्या वाकुर्डे प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी लागणारा 200 कोटीचा निधी 2 - 3 टप्प्यात देऊन या प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण केली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना केली.


शिराळा येथे 15 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन, साडेआठ कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन तसेच यशवंत सहकारी दुध उत्पादक प्रक्रिया संघ, मर्या.शिराळा या संस्थेच्या विस्तारीत दुध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, आमदार‍ शिवाजीराव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.


वाकुर्डे उपसा सिंचन योजनेची 80 टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे करुन शिराळा, वाळवा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीला पाणी देण्यासाठी 200 कोटींची आवश्यकता असून हा निधी 2-3 टप्प्यात देऊन हा प्रकल्प निश्चितपणे मार्गी लावला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या ताकारी, म्हैसाळ, टेंभू या प्रकल्पांची उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पांसाठी आता पैशांची कमतरता नसून ताकारी, म्हैसाळसाठी 1700 कोटी रुपये केंद्राकडून उपलब्ध केले जात आहेत. तसेच टेंभू प्रकल्पाचा 5 वा टप्पाही पूर्ण करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात 80 हजार कोटीचे पाटबंधारे प्रकल्प असून यासाठी केंद्राकडून 26 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी 12 हजार कोटी नाबार्डकडून मिळाले असल्याने राज्यातील पाटबंधारे प्रकल्प निश्चिपणे मार्गी लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


चांदोली अभयारण्य आणि परिसराचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा यासाठी येत्या 15 दिवसात सर्व संबंधितांची विशेष बैठक आयोजित करुन चांदोली पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबत ठोस उपाययोजना केल्‍या जातील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना दिली. याबरोबरच शिराळ्याची जगप्रसिध्द नागपंचमी असून या नागपंचमीत जिवंत नागांची पुजा करण्यावर असलेल्या बंधनाबाबत केंद्र शासनाकडे विशेष बैठक घेऊन निश्चितपणे मार्ग काढण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही ही त्यांनी याप्रसंगी बोलताना दिली.

बचत गटांतील महिलांच्या उत्पादनांना स्थानिक पातळीवर विक्री व्यवस्था उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर बचत गटांसाठी उत्पादनांसाठी मॉलस् विकसित करण्याचा मानस असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले, बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीचं काम होत असून बचत गटांना सहाय्यभूत होण्याची शासनाची भुमिका असून मायक्रो फायनांन्स कंपनीच्या माध्यमातून बचतगटातील महिलांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.


राज्यातील जनता आता राजा झाली असून  प्रशासक हे सेवक असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने सेवा हमी कायद्याद्वारे जनतेला कायद्याव्दारे फार मोठा अधिकार दिला आहे. यामुळे या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांना आता घरचा रस्ता दाखविला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सामान्य माणसासाठीचं रयतेचे राज्य हा विचार डोळ्यासमोर ठेऊन राज्य शासनाचा कारभार सुरु आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचे जागतिक दर्जाच्या स्माकाच्या कामाला सुरुवात झाली असून जगातील सर्वात उंच हे स्मारक आहे.  हे केवळ शिवस्मारक नसून ते जगाचे प्रेरणास्थान असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा डिजिटल कनेक्टीव्हीटीच्या माध्यमातून जोडण्याचा प्रकल्प शासनाने हाती घेतला असून यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे मोठ-मोठ्या आणि चांगल्या हॉस्पिटलना जोडून आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. शिराळा येथील उप जिल्हा रुग्णालय याच धर्तीवर उभारण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. डिजिटल कनेक्टीव्हीटीद्वारे राज्यातील 2018 पर्यत 29 हजार ग्रामपंचायती जोडल्या जात असून 17 हजार शाळा डिजिटल कनेक्टीव्हीटीच्या माध्यमातून जोडल्याने ग्रामीण भागातही शिक्षणाचे जाळे उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पामुळे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र सोळाव्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर आला असल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात हागणदारीमुक्तीचं प्रभावी काम होत असून येत्या आठ दिवसात सांगली जिल्हा राज्यातील दुसरा हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित होईलअशी आशाही त्यांनी व्यक्त केली.राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास वीज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा मानस असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेती पंपासाठीचे सर्व फिडर्स यापुढे सोलरवर चालविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. याबरोबरच राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनाही सोलरवर चालवून अक्षय ऊर्जा प्राप्त केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिराळा येथे आमदार शिवाजीराव नाईक यांनी सहकाराच्या माध्यमातून नवी क्रांती घडविली असून शेतकऱ्यांसाठी नवनव्या जोड धंद्याबरोबरच नव-नवे उप पदार्थ निर्मितीचे प्रकल्प हाती घेऊन ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक परिवर्तनासाठी राबविलेल्या उपक्रमाबद्दल त्यानी समाधान व्यक्त केले.


जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख या प्रसंगी बोलताना म्हणाले, सहकाराच्या सबलीकरणातून महाराष्ट्र सक्षम करुन मेक इन महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सहकार विभाग विशेषत: विकास सोसायट्या राज्याचा कणा असून या विकास सोसायट्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्यात अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. कोल्हापूरला शिखर बँकेची शाखा निर्माण करुन सोसायट्यामार्फत शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य केले जाईल. शेतकऱ्यांनी विकास सोसायट्यांचे सभासद व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.प्रारंभी सुखदेव पाटील यांनी स्वागत केले. आमदार शिवाजीराव नाईक यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी वाकुर्डे योजनेला गती मिळावी यासह चांदोली अभयारण्य परिसरात पर्यटन केंद्र विकसित व्हावे, नागपंचमी बाबतची बंधने दुर करण्यासाठी केंद्रस्तरावर पाठपुरावा व्हावा, अशा विविध मागण्या करुन शिराळा तालुक्यात राबविलेल्या विविध कामांचा त्यांनी आढावा घेतला. समारंभास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, वृक्षमित्र नाना महाडिक, रणधीर नाईक, नीत केळकर, इस्लापूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विक्रम पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा