पुस्तके माणसाचे आयुष्य समृद्ध करतात - सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 30 : एक हजाराची नोट खर्च केली तर आपल्याजवळ काहीच राहात नाही परंतू एक पुस्तक वाचून ते दुसऱ्याला दिले तर त्यातील ज्ञान आपल्या सोबत राहाते, पुस्तकांनी माणसाचं आयुष्य अधिक समृद्ध होत जाते, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

काल मुंबईत संपन्न झालेल्या चौदाव्या रेमंड क्रॉसवर्ड बुक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवी गुलजार, शेखर गुप्ता, श्रीमती अनुपमा चोप्रा, ट्विंकल खन्ना, यांच्यासह क्रॉसवर्ड बूक समूहाशी संबंधित व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते हेल्थ ॲण्ड फिटनेस गटातील पुरस्कार श्रीमती पायल गिडवानी यांना त्यांच्या बॉडी गॉडेसेस, द कंपलिट गाईड ऑन योगा फॉर विमेनया पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी मेधा देशमुख- भास्करन यांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचे प्रकाशन ही करण्यात आले. कार्यक्रमात गुलजार यांच्या हस्ते रस्कीन बॉण्ड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर विविध दहा गटांमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले.

पुस्तकांसाठी लागणारा कागद वन विभागाच्या झाडांपासून मिळत असल्याने पुस्तकांचे विश्व अधिक संपन्न राहावे याची काळजी वन विभाग घेत आहे. त्याकरिता वन विभागाने लोकसहभागातून दि. १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी ८२ लाख झाडे लावली असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आपण जर दोन रुपये कमवत असू तर त्यातील एक रुपया हा पोटासाठी आणि १ रुपया हा पुस्तकांसाठी खर्च केला पाहिजे असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. पुस्तकांचे मानवी आयुष्यातील महत्व लक्षात घेऊनच वन विभागाने विभागाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके देऊन स्वागत करण्याची प्रथा रुढ केली. ते पुढे म्हणाले की, लोकांना आज त्यांच्या जीवनात निर्मळ आनंद हवा आहे. तो आनंद पुस्तकेच देऊ शकतात. भारतीय संस्कृतीमध्ये पुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण असून या संस्कृतीला प्रवाही ठेवण्याचे काम पुस्तकांनी अतिशय सहजरीत्या पूर्ण केले, करत आहेत आणि भविष्यात ही करत राहतील.

ज्येष्ठ कवी गुलजार यांनी रस्किन बॉण्ड यांच्या वैविध्यपूर्ण शैलीतील लिखाणाचा यावेळी गौरव केला.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा