अवयवदान अभियानात उत्कृष्ट कामगिरीबाबात केंद्र शासनाकडून राज्याचा गौरव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 30 : आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमीत्त आज केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय अवयव आणि टिशु प्रत्यारोपण संस्थेद्वारे  अवयवदानाबाबत समाजात प्रभावीपणे प्रबोधन करून जागृती निर्माण केल्याबद्दल उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाला प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे अवयवदान अभियान ऑगस्ट महिन्यात राज्यभर राबविण्यात आले होते. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानानंतर १३१ किडनी, 104 यकृत, १ फुफ्फुस, १ स्वादुपिंड आणि ३५ हृदय इतक्या अवयवांचे दान करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यभर चालविलेल्या अभियानानंतर अवयवदानात दुपटीने वाढ झाली आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालये तसेच रूग्णालयात राबविलेल्या या अभियानामुळे नागरिकांत जागृती झाली आहे. राज्य शासनाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तामिळनाडूबरोबरच महाराष्ट्र शासनाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात सुलेखा जोशी यांना उत्कृष्ट समन्वयक तर रूबी हॉल रूग्णालय यांना उत्कृष्ट रूग्णालयाचा पुरस्कार देण्यात आला. अवयव प्रत्यारोपण समितीच्या माजी सचिव श्रीमती सुजाता पटवर्धन या उपस्थित होत्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
राज्य शासनाने प्रथमच राबविलेल्या या अभियानाच्या यशाबद्दल वैद्यकीय शिक्षण  मंत्री श्री. गिरीष महाजन यांनी सांगितले की, राज्यात तसेच देशात अनेक रूग्ण अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, मृत रुग्णांच्या नातेवाईकांत अनेक गैरसमज असल्याने ते मृत अवस्थेतील रूग्णाचे अवयवदान करीत नाहीत. तसेच मृत व्यक्तीचेही अवयव दान करण्याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. याबाबतच प्रबोधन करण्याचा राज्य शासनाने अनोखा प्रयत्न केला असून, त्यात शासनास यश प्राप्त झाले आहे. आता, राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयातही अवयवदान करण्यासाठीची सोय करण्यात यावी यासाठी शासन प्रयत्न करेल.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा