दिगंबर पालवे, रमेश मोरे यांना स्नेहपूर्ण निरोप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ सहायक संचालक (प्रकाशने) दिगंबर पालवे आणि सहायक अधीक्षक रमेश मोरे यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या सत्कार समारंभ आज मंत्रालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (माहिती)(वृत्त) देवेंद्र भुजबळ, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा.ना.मुसळे, उपसंचालक (लेखा) श्री.भोईर, उपसंचालक (प्रकाशने) सुरेश वांदिले, उपसंचालक (वृत्त) ज्ञानेश्वर इगवे आदी उपस्थित होते.
       
सचिव तथा महासंचालक श्री.सिंह म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हा एक परिवार असून यातील व्यक्ती निवृत्त झाला तरी तो परिवारातून बाहेर पडत नाही. विभागाशी तो सदैव जोडलेलाच राहतो. या विभागात काम करताना सर्वांनाच वेळेचे बंधन न पाळता काम करावे लागते त्यामुळे ते परिवाराला वेळ देऊ शकत नाही. सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण वेळ त्यांनी आपल्या कुटुंबासाठी द्यावा अशी इच्छा व्यक्त करून त्यांनी सुदृढ आरोग्य जपण्याचा सल्ला दिला.
       

महासंचालनालयात काम करताना कधी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल. याची कल्पना नसते. यासाठी सदैव कार्यतत्पर रहावे लागते. अशावेळी कामाची जबाबदारी सोपविताना ज्या व्यक्ती डोळ्यासमोर येतात त्यामध्ये श्री.पालवे आणि श्री.मोरे यांची नावे येतात. त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते समर्थपणे पेलणार यात शंका नसे, असे गौरवोद्गार संचालक (माहिती) श्री.भुजबळ यांनी काढले. ते म्हणाले, श्री.पालवे आणि श्री.मोरे या दोघांमध्ये साम्य म्हणजे हे दोघेही मितभाषी पण कामसू स्वभावाचे होते.
       
यावेळी उपसंचालक (प्रकाशने) श्री.वांदिले म्हणाले, काम करण्याचा आदर्श कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री.पालवे आहेत. त्यांच्याकडे पाहताना त्यांच्यामध्ये देवत्व असल्याचा भास मला सदैव होतो. प्रकाशने शाखेत काम करताना त्यांनी केलेली फाईल ही मान्य होऊनच यायची. इतकी ती परिपूर्ण असायची. श्री. पालवे यांनी जवळपास ३६ वर्षे सेवा केली. या त्यांच्या सेवाकाळात त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांशी जवळीक साधली.
       
यावेळी उपसंचालक (लेखा) श्री.भोईर, अवर सचिव श्री.मुसळे, उपसंचालक (वृत्त) ज्ञानेश्वर इगवे, वरिष्ठ सहायक संचालक डॉ.संभाजी खराट, प्रवीण टाके, सेवानिवृत्त कर्मचारी पांडुरंग मळीक, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहायक संचालक (महान्यूज) अर्चना शंभरकर यांनी केले.  यावेळी श्री.पालवे व श्री.मोरे यांचे कुटुंबिय, महासंचालनालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टॅबचे वितरण
       आधुनिक माध्यमांमध्ये काम करताना ते अधिक प्रभावी व गतिमानतेने व्हावे यासाठी सचिव तथा महासंचालक श्री.सिंह यांच्या पुढाकाराने महासंचालनालयाचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सचिवांच्या हस्ते विभागीय संपर्क अधिकारी डॉ.सुरेखा मुळे आणि अवर सचिव श्री.मुसळे यांना टॅबचे प्रातिनिधीक वितरण करण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा