न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी ‘सीईटी २०२५’ जाहीर

मुंबई, दि. २२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्यामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेपूर्व प्रशिक्षणाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘सीईटी २०२५’ जाहीर करण्यात आली आहे.

यासाठीची जाहिरात २९ जुलै रोजी प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया दि. १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २० मे रोजीच्या आदेशानुसार, ‘न्यायिक सेवा सीजे-जेडी’ व ‘जेएमएफसी’ परीक्षेस पात्र होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कायदेशीर सराव अनिवार्य करण्यात आला आहे.

त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सादर करताना सनद आणि न्यायालयीन सरावाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी आधीच ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांनी अर्जाची प्रत, सनद आणि अनुभव प्रमाणपत्र २५ ऑगस्टपर्यंत bartijmfc@gmail.com या ईमेलवर सादर करणे बंधनकारक आहे.

 

निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास उमेदवाराचा ‘सीईटी २०२५’ साठी विचार केला जाणार नाही, अशी माहिती बार्टी संस्थेकडून देण्यात आली आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/