- पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या
- संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश
यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी पुरस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. पंचनामे करतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री वॅाररुममधून दुरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्याच्या पुरस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस यवतमाळ येथून जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्यासह पाटबंधारे, जलसंपदा, बांधकाम, वीज वितरण, जलसंधारण आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
गेले दोन दिवस जिल्ह्यात सतत पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतेक महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली झाली आहे. काही ठिकाणी शेती व घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंत्रणांनी तातडीने शेतीपिके, शेतजमीनींचे पंचनामे केले पाहिजे. पंचनामे करतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे पालकमंत्री म्हणाले.
जिल्ह्यातील काही धरणांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आवक झाली आहे. त्यामुळे या धरणांमधून पाणी सोडणे आवश्यक असल्यास रात्रीच्यावेळी न सोडता दिवसा सोडावे. त्यापुर्वी नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्या. नदी, नाल्याच्या शेजारी असलेल्या शेतांचे देखील नुकसान झाले आहे. अशा नुकसानीचे देखील पंचनामे करण्यात यावे. काही ठिकाणी वीज पुरवठा बाधित झाल्याच्या तक्रारी आहे, अशा ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पुरस्थितीमुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले असल्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी पाण्यात ब्लिचिंग पावडर सोडण्यात यावी. पाणी स्त्रोत जास्त दूषित असल्यास पिण्याच्या पाण्याचा तात्पुरत्या स्वरुपात टॅंकरने पुरवठा करण्यात यावा. ज्या ठिकाणी गावांचा संपर्क तुटला होता, अशा गावात रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
घरे, जनावरांचे नुकसान किंवा पुरस्थितीत जिवीत हाणी झाल्यास शासनाकडून तातडीने सानुग्रह अनुदान दिले जाते. अशा मदतीचे वाटप तातडीने करण्यात यावे. पुरस्थितीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी शवविच्छेदन अहवाल तातडीने प्राप्त करून घेण्यात यावे. सद्या पुरस्थितीचे दिवस असल्याने विभाग, तालुका व गावस्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडू नये, सर्व विभागांनी समन्वयाने परिस्थिती नियंत्रणासाठी काम करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचेही सर्व्हे करा
अतिवृष्टीत शेतपिके, शेतजमीनी, घरांची पडझड, जनावरांचे नुकसान होते. आपण नेहमी अशाच नुकसानीचे सर्वेक्षण करतो. त्यामुळे शासकीय मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीसाठी शासनस्तरावरून मदत मिळत नाही. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करतांना शासकीय रस्ते, वीज खांब कोलमडने, तारा तुटने, पाणी पुरवठा योजना, शासकीय ईमारतींच्या नुकसानीचे देखील सर्वेक्षण करून अहवाल शासनास सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.
जिल्ह्यात 90 हजार हेक्टर पिकांचे नुकसान
जिल्ह्यात दि.15 जुनपासून आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 640 गावे व 1 लाख 34 हजार शेतकरी बाधित झाले आहे. या शेतकऱ्यांचे 90 हजार 924 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधित 47 हजार 560 हेक्टर नुकसान एकट्या उमरखेड तालुक्यात झाले. त्यापाठोपाठ महागाव 17 हजार 934 व पुसद तालुक्यात 14 हजार 736 हेक्टरवर नुकसान झाले आहे. वीज पडून एका तर पुरात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. पुरस्थितीत 45 जनावरे दगावली तर 250 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे
०००