पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाटण तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी

सातारा दि. २०: सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पाटण तालुक्यातील पाटण, हेळवाक येथील पूर परिस्थितीचे व नवजा कडे खचलेला रस्ता यांची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी पाटण नगरपंचायतीमधील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व जुनिअर कॉलेज या ठिकाणी स्थलांतरित नागरिकांची भेट घेऊन त्यांनाही दिलासा दिला.

पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी त्यांना निवाऱ्यासह सर्व सोयी उपलब्ध करून दिलासा देण्याच्या सूचना केल्या.

याप्रसंगी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्तांशी पालकमंत्र्यांचा संवाद

पाटण येथील पूरग्रस्तांना कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल मध्ये 34 कुटुंबांना निवारा उपलब्ध करून दिला आहे. या पूरग्रस्तांशी पालकमंत्री देसाई यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.

पूरग्रस्त स्थलांतरितांना जेवण, अंथरून पांघरून, चहा, नाश्ता वेळेवर  मिळाला आहे ना,  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्युत व्यवस्था यांची व्यक्तीशः चौकशी पालकमंत्री देसाई यांनी केली.

या ठिकाणी स्थलांतरित असलेल्या अनेकांनी आपल्याला राहायला घर नसल्याची कैफियत मांडली. स्थलांतरितांपैकी ज्यांना हक्काचा निवारा नाही अशांनी घर देण्याची विनंती केली. यावर त्यांच्या समस्या जाणून घेत पालकमंत्री देसाई यांनी पाटण नगरपंचायत क्षेत्रात वर्षानुवर्षे राहत असलेल्या व ज्यांना घर नाही अशा पूरग्रस्तांची यादी तयार करावी, यादीनुसार घरांच्या कामासाठी जागा व वसाहतीसाठी निधीही उपलब्ध देण्यात येईल अशी ग्वाही दिली. शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांडूनही पाटण तालुक्यातील विविध पूरग्रस्त भागाची पाहणी

पाटण, नावडी व तांमकडे या गावातील पूर परिस्थितीची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाहणी केली. पुरामुळे कुठल्याही गावाचा संपर्क तुटणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रांताधिकारी व तहसिलदारांना केल्या. पूर परिस्थितीमुळे कोणतीही जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना करून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ज्या गावांमध्ये धरणातील विसर्गामुळे दूषित पाणी येत आहे अशा गावातील नागरिकांनी इतर स्त्रोतातून पाणी पिण्यासाठी उपयोग करावा व पाणी उकळून प्यावे. स्थलांतरित नागरिकांची जिल्हाधिकारी यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच कोणाला आरोग्य विषयी समस्या असल्यास त्यांनी या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. त्यांना उपचार दिले जातील असे सांगितले. पूरग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून वेळेवर चहा, नाश्ता, जेवण मिळत असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.

०००