नांदेड दि. २० : मागील पाच ते सहा दिवसांपासून संपूर्ण राज्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.
आज हदगाव तालुक्यातील करमोडी येथे भेट देवून त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाबुराव कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत व परिसरातील शेतकरी, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
पाच ते सहा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक अंदाजानुसार 20 लाख 12 हजार एकर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये एकट्या नांदेड जिल्हृयात 2.59 लक्ष हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणच्या शेतातील माती वाहून गेलेली आहे. तर पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरात पाणी शिरले असून घराची मोठी पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्यावतीने सुरु केले आहेत. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन ज्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतचा अहवाल प्राप्त होताच त्यांना शासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
नांदेड विमानतळावर मंत्री भरणे यांची आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोढारकर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी भेट घेवून नांदेड जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाई आणि इतर प्रश्नावर चर्चा केली.
०००