आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून अतिवृष्टी स्थितीचा आढावा

मुंबई, दि. २० : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ.भालचंद्र चव्हाण यांनी राज्यातील हवामानाविषयी अनुषंगिक माहिती दिली. यावेळी आमदार विजय रहांगडाले उपस्थित होते.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ज्या जिल्ह्यात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिले आहेत, त्या ठिकाणी संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांना वेळीच दक्षता इशारा देण्यात यावेत. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ याबाबत नागरिकांना सूचना देण्यात याव्यात. पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे, अशा सूचना मंत्री महाजन यांनी दिल्या.

भारतीय हवामान विभागाशी सातत्याने संपर्कात राहून राज्यातील पर्जन्यमांचे अंदाज नागरिकांना वेळेत दिले जावेत. आवश्यक त्या ठिकाणी राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पाठवावीत, अशा सूचनाही मंत्री महाजन यांनी यावेळी दिल्या.

 

०००

 

एकनाथ पोवार/विसंअ/