राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा, नुकसानीचे तातडीने पंचनामे

मुंबई, दि. १९ : – राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. जीवितहानी, पशूधन आणि घरांचे नुकसानीसाठी तातडीने मदतीसाठी अधिकारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.शेतीच्या नुकसानीचेही तातडीने पंचनामे करावेत आणि एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे भरपाई देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मंत्रिमंडळ बैठकीतही राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. राज्यातील सुमारे १२ ते १४ लाख एकरवरील पिकांना फटका बसल्याची माहिती प्रथमदर्शनी हाती आल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. अजूनही पावसाचा जोर ओसरला नाही. त्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्कतेचे आणि समन्वयाचे निर्देश देण्यात आले आहेत. वेध शाळांकडून मिळणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने राज्यातील नागरिकांना पावसाबाबत दर तीन तासांनी सतर्कतेचे (अलर्ट) देण्यात येत आहेत.

नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्यातील सर्व आपत्ती नियंत्रण कक्षांना दक्ष राहण्याचे आणि माहितीचे अदान-प्रदानाबाबत समनव्य राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

*शेजारी राज्यांशीही उत्तम समन्वय..*

राज्यातील पावसाचा जोर आहे. त्यामुळे विविध प्रकल्पातून होणारा विसर्ग यावर संनियंत्रण कऱण्यात येत आहे. यासाठी शेजारच्या राज्यातील प्रकल्पांबाबतही पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय राखण्यात येत आहे. त्या राज्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः हिप्परगी मधून अधिकचा विसर्ग व्हावा यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. तेलंगणाच्या जलसंपदा विभागांशीही समन्वय साधण्यात येत आहे.

मुंबईतील परिस्थितीवर सातत्यपूर्ण लक्ष…

अतिवृष्टीचा फटका मुंबई महानगराला सर्वाधिक बसला आहे. कालपासून पाऊस सुरूच आहे. त्यातच आज काही तासांत अतिवृष्टीच्या मानकांहून अधिक पाऊस झाला. अनेक सखल भागात पाणी साचले ही वस्तुस्थिती आहे. पण त्यावर मुंबई महापालिकेच्या सर्वच यंत्रणांसह, राज्याच्या यंत्रणा समन्वयाने काम करत आहे. उपनगरीय लोकल रेल्वे गाड्यांची सेवा काही तास खोळंबली. या सगळया परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा पराकाष्ठा करत आहेत. मुंबई शहर परिसरात खबरदारी म्हणून कार्यालयांनाही सुटी देण्यात आली.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वसई, पालघर या भागात आधीच रेड अलर्ट देण्यात आला होता. कमी दाबाच्या या पट्ट्यामुळे अतिवृष्टी होणारच. पण त्यावर आपण कुठे, किती पाऊस पडतो आहे. याबाबतचे अलर्ट दर तीन तासांनी पाठविण्याची व्यवस्था उभी केली आहे.

 

राज्यातील अनेक नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे काही नद्या इशारा पातळीपर्यंत पोहचल्या आहेत. मुंबईत मात्र मिठी नदीने धोका पातळी ओलांडली. त्यामुळे सुमारे चारशे जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबई शहरातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मिठी नदी परिसरालाही भेट दिली आहे. मिठी नदीतील गाळ उपसण्यात कुचराई झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत आता सुरस आणि चमत्कारिक गोष्टीही बाहेर येत आहेत. यावर मुंबई महापालिकेला आता पुन्हा नव्याने गाळ काढण्याबाबत कार्यवाही करावी लागणार आहे, त्याबाबतही आदेश दिले आहेत.

००००