नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले असून कोणत्याही गरिब व्यक्तीला या सुविधा पोहचविण्यासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर योजनांच्या माध्यमातून सक्षम वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
पाटणसावंगी येथील तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळयात ते बोलत होते. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विनायक महामुनी, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व मान्यवर उपस्थित होते.
विविध विकास योजनेमध्ये आपण आरोग्यासाठी अधिक प्राधान्य दिले आहे. याच भूमिकेतून हे प्राथमिक आरोगय केंद्र सुरु झाले पाहिजे या दृष्टीने आपण इतर वैद्यकीय उपकरणांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करुन दिला. यासाठी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी कौतुक केले. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे व आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
सद्यस्थितीत सावनेर तालुक्यामध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर अंतर्गत २० खाटांचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटणसावंगी, केळवद, बडेगाव, चिचोली खापा अशी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ३३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, २ आयुर्वेदिक/अॅलोपॅथिक दवाखाना, १ हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, २५ आयुष्यमान आरोग्य मंदिर व ३ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र कार्यान्वित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.
नागपूर जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांकरिता १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, ५०० खाटांचे महिला रुग्णालय, ५० खाटांचे २ उपजिल्हा रुग्णालय, ३० खाटांचे ११ ग्रामीण रुग्णालय, ३ ट्रामा केअर सेंटर, १४ हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ५८ आयुष्यमान आरोग्य मंदिर, ३१७ उपकेंद्र, ०६ संदर्भ सेवा केंद्र कार्यान्वित आहेत.
पाटणसावंगी येथील या नव्या केंद्रामध्ये सुसज्ज असे मोडयुलर शस्त्रक्रिया गृह तसेच मोडयुलर प्रसुतीगृह स्थापित करण्यात आलेले आहे. सावनेर तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय कार्यरत नसल्यामुळे सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाला शासनाने मान्यता दिली. ग्रामीण रुग्णालय, पाटणसावंगी येथे साधन सामुग्री, रुग्णवाहिका, आहार सेवा, स्वच्छता सेवा, सुरक्षासेवा, धुलाई सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
येथे बाहयरुग्ण व आंतररुग्ण सेवा उपलब्ध करण्यात येत आहेत. जनरल मेडीसीन (पुरुष व स्री), स्त्रीरोग, बालरोग, कुटुंब कल्याण, असंसर्गजन्य रोग, आयुष, सिकल सेल, सेवा, प्रयोगशाळा क्षकिरण, ईसीजी, गर्भवती महिलांची तपासणी, लसीकरण, पटटीबंधन, समुपदेशन आदी सेवा उपलब्ध होणार आहे
०००