पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार

यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे अवयवदानाबाबत अर्ज भरुन घेण्यात आले. त्यातील काही अवयवदात्यांचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहनप्रसंगी आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. सुखदेव राठोड उपस्थित होते.

अवयवदान या विषयावर जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.राठोड यांची आकाशवाणीवरून अवयवदानाविषयी माहिती दिली होती. पथनाट्य, पोस्टर डिस्प्ले स्पर्धा व इतर कार्यक्रम तसेच अवयवदात्यांच्या मुलाखती घेवून जनतेत अवयवदानाविषयी  जनजागृती करण्यात आली होती. अवयवदान शपथपत्र ऑनलाईन पद्धतीने भरुन घेण्यात आले आहेत.

पालकमंत्र्यांच्या हस्ते राजेश रघुनाथ देशपांडे, रुपाली प्रवीण केवटे या दोन अवयवदात्यांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. तसेच अभिषेक गजानन तोडासे, संगिता गजानन तोडासे यांचा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सत्कार करण्यात आला. अवयवदान हे सामाजिक कार्य असून एक अवयवदाता पाच ते सात गरजू व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे जनतेने अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी केली आहे.

०००