किसान समृद्धी प्रकल्पांमुळे माल थेट बाजारपेठेत विकण्याची संधी – पालकमंत्री संजय राठोड

वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत ११ प्रकल्पांचे उद्घाटन

  • जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकल्पांवर १२ कोटी ४७ लाखाचा खर्च

यवतमाळ, दि. १८ (जिमाका): वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतवारी, ग्रेडिंग व प्रक्रिया युनिट तसेच पांढरा कोळसा व पशुखाद्य निर्मितीच्या 11 प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते स्वातंत्र्यदिनी झाले. या प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना आपली उत्पादने थेट बाजारपेठेत विकण्याची क्षमता मिळेल आणि त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महसूलभवन येथे पार पडलेल्या या उद्घाटन कार्यक्रमास आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व जिल्हा व्यवस्थापक तसेच विविध महिला शेतकरी गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

सर्व प्रकल्प उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत स्थापित करण्यात आले आहे. या प्रकल्पांवर 12 कोटी 47 लाख इतका निधी खर्च करण्यात आला आहे. प्रकल्पांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिला शेतकरी गटांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादनाची गुणवत्ता वाढवून थेट बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान मिळवून देणे आहे. धान्य प्रतवारी व ग्रेडिंग युनिटमुळे शेतकऱ्यांना स्वच्छ, निवडक आणि गुणवत्तापूर्ण धान्य तयार करून त्याला चांगला दर मिळण्यास मदत होईल. प्रक्रिया युनिटमुळे स्थानिक स्तरावरच पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विक्रीची सुविधा निर्माण होणार आहे.

पांढरा कोळसा बायो-कोल निर्मिती प्रकल्पामुळे कृषी अवशेषांचा उपयोग करून पर्यावरणपूरक इंधन तयार होईल. पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होईल आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन मिळेल. पशुखाद्य निर्मिती प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण खाद्य उपलब्ध होऊन पशुपालन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच पशुपालकांचा उत्पादन खर्च कमी होईल.

वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रम हा केवळ तांत्रिक सुविधा पुरविण्याचा उपक्रम नसून तो ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाचा नवा टप्पा आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून महिला शेतकरी संघटनांना उत्पादन व्यवस्थापन, वित्तीय नियोजन, मार्केटिंग व ब्रँडिंग याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे महिलांना उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रात हा उपक्रम एक आदर्श ठरणार असून आगामी काळात या मॉडेलच्या आधारे इतर भागातही अशा सुविधा निर्माण करण्याची दिशा ठरवली जाणार आहे

०००