गावोगावी विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव पंचायत समितीच्या विकासकामांचा आढावा

घरकुल तक्रारींचे निवारण करून मार्ग काढणार

जळगाव दि. १८ (जिमाका):  “गरिबांना हक्काची घरे वेळेत मिळणे ही आपली जबाबदारी असून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत,” असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव पंचायत समितीत झालेल्या तक्रार निवारण आढावा बैठकीत केले.

पालकमंत्री म्हणाले की, जल जीवन मिशनची कामे गतीमान व्हावीत. ग्रामपंचायत कार्यालये, शाळा खोल्या, अंगणवाड्या, स्मशानभूमी व पोहोच रस्ते या दैनंदिन गरजांशी निगडीत सुविधा वेळेत उभारल्या जाव्यात. ग्रामीण पाणंद रस्त्यांना आवश्यकतेनुसार VR दर्जा मिळवून द्यावा, यासाठी अभियंत्यांनी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढवून शाळाबाह्य एकही विद्यार्थी राहू नये याची दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV बसविण्याची प्रक्रिया सुरू असून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत घरकुल, गोठे बांधकाम, अतिक्रमण, शिक्षण, अंगणवाडी बांधकाम व ग्रामपंचायत विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांवर सविस्तर चर्चा झाली. आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींनी घरकुलासह इतर तक्रारींचा निपटारा 8-10 दिवसांत करून योजना प्रभावीपणे राबवाव्यात. “ग्रामपंचायत ते पंचायत समिती हा महत्वाचा टप्पा असून येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्परतेने सेवा दिल्यास योजनांचा खरा लाभ नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचेल,” असे त्या म्हणाल्या.

यावेळी पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच बोलणार ग्रामपंचायत इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आला.

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी गटविकास अधिकारी सरला पाटील यांनी आभार मानले. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) भाऊसाहेब अकलाडे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, जनार्दन आप्पा कोळी, हर्षल चौधरी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, रमेश आप्पा पाटील, रवी कापडणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००