लातूर, दि. १५: जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितले.
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री भोसले बोलते होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार बांधव, विद्यार्थी, पालक व नागरिक यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकटीकरणाला गती देण्यात आली आहे. लातूर शहराच्या २९० कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. तसेच जिल्ह्यात जलसंधारण आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना, जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार यासारख्या योजनांमुळे शेतीला बळ मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. जिल्ह्यातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत आतापर्यंत ८८२ किलोमीटर लांबीचे ६७८ रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. लवकरच या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भोसले म्हणाले.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून जिल्ह्यातील २७ आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन मिळाले आहे. यासोबतच गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सहाय्य मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षामार्फत अवघ्या तीन महिन्यात १४३ रुग्णांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात आल्याचे पालकमंत्री भोसले म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. आता या मोहिमेचा दीडशे दिवसांचा दुसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स सुधारणा, आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा यांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्हा परिषदेने व्हाटसअप चॅटबोट उपक्रम सुरु केला आहे. यामाध्यमातून नागरिकांना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती व्हाटसअपवर मिळेल. नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान केल्यामुळे उदगीर उपविभागीय कार्यालय, लातूर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाले असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
जवळपास ८० हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजनेतून जिल्ह्यात ४७ सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून यामधून २३० मेगावॉट वीज निर्मिती होत आहे. त्यामुळे जवळपास ८८ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळत असल्याचे पालकमंत्री भोसले यांनी सांगितले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, आदिशक्ती अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य शासनाने आदिशक्ति अभियान सुरु केले आहे. याअंतर्गत महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच यंदा प्रथमच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविले जाणार आहे. गावा-गावांमध्ये विकासाची निकोप स्पर्धा निर्माण होण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
राज्यातील सर्वात कमी वृक्ष असलेल्या जिल्ह्यांमध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश होतो. हे चित्र बदलण्यासाठी ‘आपलं लातूर, हरीत लातूर’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होवून प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे, असे आवाहन पालकमंत्री भोसले यांनी केले.
ध्वजारोहणानंतर पोलीस उपनिरीक्षक रामदास मिसाळ यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, विद्यार्थी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
०००