शेती, शेतकरी केंद्रबिंदू मानून शासनाची प्रगतीकडे वाटचाल – मंत्री दादाजी भुसे

भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात

अमरावती, दि. १५ (जिमाका): स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यात येत आहे. यासोबतच समाजातील प्रत्येक घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. लोकाभिमूख योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविण्यात येत आहे. सर्वंकष प्रयत्नांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे. समाजातील वंचित घटक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आदीसोबतच शेती आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून सर्वसमावेशक विकास करून राज्य प्रगतीकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा 78व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील, राज्‍य माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद, कमलताई गवई आदी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर विकासाच्या बाबतीत देशाने मोठा पल्ला गाठला आहे. देशाच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्त्व असल्याने राज्याने कृषी क्षेत्राला प्राथमिकता दिली आहे. शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते वेळेत उपलब्ध करून दिली आहेत. तसेच पिककर्ज उपलब्ध होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यावर्षी बँकांनी 88 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 250 कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यासोबतच 85 हजार शेतकऱ्यांच्या 1 लाख 32 हजार हेक्टर शेतीपिकांना विमा संरक्षण मिळाले आहे. शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 4 लाख शेतकऱ्यांना 642 कोटींच्या निधी वाटपासाठी मान्यता दिली आहे.

शेतीशी निगडीत विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी ई -केवायसी आणि आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यावे, तसेच येत्या खरीप हंगामासाठी ई-पिक पाहणी महत्त्वपूर्ण असून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई मिळविण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 100 टक्के ई-पिक पाहणी करावी, असे आवाहन केले.

राज्यातील गोरगरीब, गरजू रुग्णांना अडचणीच्या वेळेस मदत मिळावी, यासाठी राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’कक्षामार्फत 1 जानेवारी ते 31 जुलै 2025 दरम्यान 231 रुग्णांना 2 कोटी 20 लाखांची मदत देण्यात आली आहे. कक्षामार्फत विविध आरोग्य विषयक योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. विस्थापित सिंधी समाजाला पट्टे वाटपाचा पहिला कार्यक्रम जिल्ह्यात पार पडला. सिंधी बांधवांना दिलेल्या जमिनीचा मालकीहक्क मिळाले आहे. येत्या काळात राज्यभरात हा उपक्रम राबवून सुमारे 5 लाख कुटुंबांना पट्टेवाटपाचा लाभ होणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वार्षिक 290 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून 245 कोटी रुपयांचे पुरस्कार वाटप करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली जात आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर शिकविणे, सीबीएसई माध्यमातून मराठी अनिवार्य केली आहे. ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमात 2 कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संजय अंबाडेकर, संजय पाटील, राजेश कोचे, प्रणिता निस्ताने, निलेश शिरभाते, दीप्ती अग्रवा, दिलीप मेश्राम, अलका बाबील, रत्नमाला खराटे, बद्रूनिसा सिकंदर, लक्ष्मीबाई देवगन, मोहन राठोड, डॉ. सुरेंद्रकुमार ढोले, चंदा खोडके यांचाही सत्कार करण्यात आला. अनुकंपा धोरणांतर्गत कोतवाल पदावर अमरावती तहसील कार्यालयाने ज्योती अमोल चव्हाण यांना प्रथम नियुक्ती दिल्याबद्दल मंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

०००