आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

अभियंता भवन येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन

अमरावती, दि. १५: समाजातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर वैद्यकीय संस्थांच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त नवचैतन्य बहुउद्देशीय विकास संस्था आणि गोविंदम् हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने अभियंता भवन येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, बनकर हॉस्पीटलचे प्रबंधक डॉ. जयप्रकाश बनकर, सौ. गायत्री बनकर, दै. विदर्भ मतदारचे संपादक ॲड. दिलीप एडतकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसाले, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवार, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉ. अमोल नरोटे, डॉ. अलका कुथे, पदाधिकारी सतीश मोहोड, अरुण पडोळे, श्याम देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे सांगत, प्रत्येक नागरिकाने देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ च्या संकल्पासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. या स्वप्नाला साकार करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यावर सरकारचा भर असून, राज्यात सहा नवीन शासकीय मेडिकल कॉलेजेसना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे डॉक्टरांच्या 900 जागा वाढणार आहेत. तसेच, वैद्यकीय संशोधनानुसार नवीन अभ्यासक्रम तयार करून तज्ज्ञ डॉक्टर तयार करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमात कारगील वार मधील सहभागी कर्नल डॉ. राजेश अढाऊ, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू परिक्षित चिकटे, छत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक सदानंद जाधव, फॉरेन्सिक संशोधनात प्राविण्यप्राप्त सेजल फुटाणे, बनकर हॉस्पीटलला रुग्णवाहीका प्रदान करणाऱ्या डॉ. रंजना नवले आदींचा केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या हस्ते शाल व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व अन्य गणमान्य व्यक्ती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००