सातारा दि. १५ : रान भाज्या ह्या नैसर्गिक पद्धतीने येतात. रानभाज्या शरिरासाठी अत्यंत पोषक आहेत. त्यांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करावा, असे आवाहन त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र, सातारा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्धाटन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कृषी विभागाने नागरिकांना रानभाज्यांचे महत्व सांगून त्यांचे संवर्धनही केले पाहिजे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणााले, महिला बचत गटांच्या महिलांनी पारंपारीक पदार्थ बनविण्याबरोबर सामुहिक शेती करावी आपली आर्थिक उन्नती साधावी. महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाच्या विक्रीसाठी पाचगणी येथील बाजारपेठेत जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये मॉल उभारण्यात येत आहे. या मॉलचे काम प्रगतीपथावर असून या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मॉलमधील स्टॉल महिला बचत गटांना अत्यल्प दरात उपब्ध करुन देण्यात येणार आहे. बचत गटांच्या महिलांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.
रानभाज्यांची विक्री ही रोजगाराची नवी संधी आहे. रानभाज्या आरोग्यासाठी गुणकारी असून याचा सन्मानाबरोबर संवर्धनही केले पाहिजे असे प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शेंडे यांनी सांगितले.
कार्यक्रमा प्रसंगी पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते विविध शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. तसेच रानभाजी महोत्सवाची माहिती देणाऱ्या पुस्तीकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
0000