छत्रपती संभाजीनगर, दि. १५ (विमाका): छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रालगत वाढत जाणारे औद्योगिक क्षेत्र, लोकसंख्या विचारात घेत महानगराचा नियोजनबद्ध विकास करावा लागणार आहे. प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यालय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भवन (स्मार्ट सिटी कार्यालय) येथे स्थलांतरित झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आज पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी महापौर विकास जैन, नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, पोलीस आयुक्त प्रविण पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सिडकोचे प्रशासक जगदिश मिनियार, सहआयुक्त देविदास टेकाळे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले, महानगर नियोजनकार हर्षल बावीस्कर, सह नियोजनकार रवींद्र जायभाये, तहसीलदार सुनंदा पारवे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची व्याप्ती वाढली आहे. प्राधिकरण फक्त शहरापुरतेच नाही तर जिल्ह्यात विस्तारले आहे. त्या दृष्टीने प्राधिकरणासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा, मनुष्यबळ, नवीन इमारत यासह इतर सुविधांसाठी प्रस्ताव सादर करा, या प्रस्तावाचा शासनस्तरावर आपण पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर महानगराला प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी आपण सर्व मिळून एकत्रित काम करू, असे सांगुन पालकमंत्री शिरसाट म्हणाले, महानगरालगत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र वाढले आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेता आपल्याला शहराचा नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राधिकरणाची यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले, छत्रपती संभाजीनगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यालय आज स्मार्ट सिटी कार्यालयात स्थलांतरित झाल्याने कामाला गती मिळेल. भविष्यात शहरात अनधिकृत बांधकाचे जाळे निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. प्राधिकरण क्षेत्रात 311 गावे, सिडको व एमआयडीसी क्षेत्र वाढले आहे. या सर्व क्षेत्राला पायाभूत सुविधा द्याव्या लागणार आहेत. शेंद्रा-बिडकीन रस्ता तसेच रिंग रोड आवश्यक आहे. रस्त्यांचे जाळे निर्माण करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पापळकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत माहिती दिली.
महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, महानगरालगत असलेल्या क्षेत्राचा नियोजित पद्धतीने विकास झाला पाहिजे. त्यासाठी हे प्राधिकरण महत्त्वाचे आहे. महानगराच्या सर्वांगिण विकासासाठी प्राधिकरण मजबूत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोधचिन्ह स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. सुनील महामुनी, सचिन बोबडे, जितु होवले, माधुरी जाधव, क्षीती घारे, स्नेहा पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी महानगर प्राधिकरण, महानगर पालिका, महसूल तसेच सिडकोचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
०००