धुळे, दिनांक १५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना व प्रकल्प राबवून सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत देशाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. या समारंभास खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अपर पोलीस अधिक्षक डॉ अजय देवरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र इगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, संजय बागडे, बालाजी क्षीरसागर, महादेव खेडकर, कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सोनार, तहसिलदार प्रवीण चव्हाणके, अरुण शेवाळे, अपर तहसिलदार वैशाली हिंगे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता, वीरपत्नी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी, आपदा मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. रावल आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री महोदयांच्या स्वप्नातील विकसीत भारतात आपल्या जिल्ह्याचा देखील वाटा असावा अशी सर्वांची इच्छा आहे. यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सोयीसुविधांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यात लॉजिस्टिक पार्क, सोलर पार्क, एमआयडीसीचे विस्तारीकरण, गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन, धुळे-नरडाणा रेल्वे मार्गावर प्रस्तावित ड्राय पोर्टचे प्राथमिक सर्वेक्षण करणे, दोंडाईचा येथे फुड फार्म पार्क, रावेर येथे नवीन 2 हजार 50 हेक्टर भू-संपादन करून औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येत आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव मदत
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात 3.73 लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा पेरा झाला आहे. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार रासायनिक खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. चालू खरीप हंगामात 17 हजार 767 शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत 196 कोटींचे कर्जवाटप केले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 56 हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी या योजनेची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढविल्याने शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली 1 लाख 58 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा तर नमो किसान सन्मान योजनेचा 5 वा हप्ता नुकताच देण्यात आला आहे. ॲग्रीस्टॅक योजनेत 1 लाख 80 हजार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेत नवीन विहीरीसाठी 42, तर बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत 114 शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत 91 हजार शेतकऱ्यांना 238 कोटींची वीज बिल सवलत देण्यात आली आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे बाधित 12 हजार शेतकऱ्यांना 13 कोटींची मदत दिली. एप्रिल, मे, 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 12 हजार बाधित शेतकऱ्यांना 11 कोटी 43 लाखाचे अनुदान मंजूर केले आहे.
जिल्ह्यात नूतन इमारतींची कामे प्रगतीत
धुळे जिल्ह्यात लोकोपयोगी अनेक पायाभूत सुविधा निर्माण होत आहे. यात जिल्ह्यात 100 खाटांचे स्त्री रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, नवीन न्यायालय इमारत, नवीन प्रशासकीय इमारत, गुलमोहर विश्रामगृहाचे विस्तारीकरण, आई एकविरा देवी मंदिराचे प्रवेशद्वार, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, नाबार्ड अंतर्गत 3 शासकीय गोदामांची कामे तर नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, खुले कारागृह बांधकाम, धुळे येथे कामगार भवनास मंजूरी मिळाली असून दोंडाईचा व शिरपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यासाठी मान्यता मिळाली आहे. हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता, स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग, असे यंदाच्या हर घर तिरंगा अभियानाचे घोषवाक्य असल्याने आपण सर्वांनी स्वच्छतेला मोहिमेला महत्व देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शैक्षणिक सुविधा / 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत 42 टक्के तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीत 37 टक्के विद्यार्थी पात्र ठरल्याने धुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सेवाविषयक गुणांकन कार्यक्रमात सर्व विभागांनी सहभागी व्हावे.
प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा आघाडीवर
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आतापर्यत 62 हजार 462, शबरी योजनेंतर्गत 11 हजार 965 तर रमाई योजनेतंर्गत 8 हजार 118 घरकुले पूर्ण झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असलेल्या 1 लाख 62 हजार कुटूंबाचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे.
महिला सशक्तीकरणास प्राधान्य
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 14 हजार 600 महिला बचतगटांच्या माध्यमातून 1 लाख 50 हजार कुटूंबे जोडली गेली असून या बचतगटांना आतापर्यंत 535 कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लखपती दिदी उपक्रमात आतापर्यंत 67 हजार महिला लखपती झाल्या आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 4 लाख 89 हजारापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ दिला असून लेक लाडकी योजनेत 3 हजार 236 लाभार्थ्यांना 1 कोटी 62 लाखाचा पहिल्या हप्ता दिला. आदिवासी विकास विभागामार्फत 254 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूर केले आहे. कुकुटपालन व्यवसायासाठी 15 नोंदणीकृत आदिवासी महिला बचतगटांना 79 लाख रुपये वितरीत केले आहे.
महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी यावर्षीपासून महिला व बालविकास विभागामार्फत आदिशक्ती अभियान राबविण्यात येणार असून ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात 3 लाख कुटूंबाना नळजोडणी
जलजीवन मिशन योजनेत 794 कोटी रुपयांच्या 462 योजनांची कामे सुरु आहे. ग्रामीण भागातील 3 लाख कुटूंबाना वैयक्तीक नळजोडणी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचे आयोजन
ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.
कल्याणकारी योजनांचा लाभ
मुख्यमंत्री वयोश्री योजनेत 15 हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध साधने खरेदीसाठी तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत 654 ज्येष्ठ नागरिकांना आयोध्या धाम दर्शनाचा लाभ दिला. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने 294 दिव्यांगांना मोफत कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स बसविले. कामगार विभागामार्फत 16 हजार 227 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचे वाटप केले आहे.
आरोग्य तपासणीस प्राधान्य
कर्करोग जनजागृती सप्ताहात 841 संशयित रुग्णांची तपासणी केली. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेत 1 हजार लाभार्थ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्यस्तरावरुन 10 रुग्णवाहिका, जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस व राज्य राखीव पोलीस दलास 13 वाहने दिली.
पणन विभागामार्फत 3 हजार 588 शेतकऱ्यांना 14 कोटी 63 लाखाचे कांदा अनुदान दिले. यावर्षी शासनाने सोयाबीन व तुरीची विक्रमी खरेदी केली आहे. अटल अर्थसहाय्य योजनेतंर्गत 30 सहकारी संस्थांना मंजुरी दिली. सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस 5 हजार 329 कोटी 46 लक्षची द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाल्याने 33 हजार 367 हेक्टर क्षेत्र सिंचीत होणार असल्याचे ही पालकमंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.
यांचा झाला सन्मान
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने निवड झालेल्या कार्यालय तसेच कार्यालय प्रमुखांना प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. यात दुय्यम निबंधक, धुळे २ (प्रथम), श्रीमती स्नेहलता पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, साक्री (प्रथम) विनायक खैरनार, तालुका क्रीडा अधिकारी,साक्री ( द्वितीय) मनोहर पाटील, गट शिक्षण अधिकारी (द्वितीय) विठ्ठल घुगे, मुख्य वनसंरक्षक (तिसरा) श्रीमती नीनु सोमराज , उप अधिक्षक भूमी अभिलेख,साक्री (तृतीय) कुंदन परदेशी, पंचायत समिती, शिंदखेडा (तृतीय) रमेश नेतनराव, पोलीस स्टेशन, पश्चिम देवपूर धुळे (तृतीय) तुषार देवरे एपीआय, सहायक वन संरक्षक,धुळे (तृतीय) योगेश सातपुते, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा,साक्री ( तृतीय) हरिषचंद्र पवार, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, तालुका पशु चिकित्सालय, शिंदखेडा (तृतीय) तुषार पाटील, उप विभागीय जल संधारण अधिकारी, धुळे (तृतीय) दिपक बाविस्कर, सहायक निबंधक सहकारी संस्था, साक्री (तृतीय) मनोज चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच होमगार्ड पलटन नायक सनद क्रमांक 5315 धुळे पथकातील श्रीमती उमा चंद्रकांत कोळवले यांना राज्यातून होमगार्ड व नागरी संरक्षण दलातील गुणवत्तापुर्ण व उल्लेखनिय कामगिरीसाठी राष्ट्रपती यांचा पुरस्कार जाहिर झाल्यामुळे सत्कार करण्यात आला.
धुळे जिल्हा कारागृह येथील भगवान सरदार यांना सन 2024-25 करिता उत्कृष्ट कामानिमित्त बजावलेल्या प्रशंसनीय सेवेबद्दल अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा यांचेकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहिर झाल्यामुळे सत्कार करण्यात आला. महसुल सहायक, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथील श्रीमती श्रद्धा पाटील यांना संजय गांधी शाखेतील उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानीत करण्यात आले. शिरपूर येथील कै.मनिष विलास सनेर यांचा अपघात झाल्यानंतर त्यांचे इच्छेनुसार परिवाराने त्यांचे अवयवदान केले. यासाठी विलास माधवराव सनेर व हर्षदा विलास सनेर यांचा सन्मान करण्यात आला. धुळे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉ. पुर्वा पंकज दहिवेलकर यांनी अवयवदानाचा संकल्प केल्याबाबत सत्कार करण्यात आला.
आर.सी. पटेल स्कुल, शिरपूर येथील इयत्ता 5 वीचा विद्यार्थी धनुष अरुण पाटील तसेच भार्गव नितीन सिसोदे यांना पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत उल्लेखनीय यश संपादन केल्याबाबत सत्कार करण्यात आला. मांजरोद गावाच्या पोलीस पाटील श्रीमती रुपाली प्रविण बैसाणे यांना थाळनेर पोलीस स्टेशन येथे आरोपीस पकडण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये प्रथम सर्वोकृष्ट तालुका पुरस्कार शिरपूर तालुक्यास, राज्यस्तरीय आवास योजना-ग्रामीण (रमाई, शबरी व पारधी) प्रथम शिंदखेडा तालुक्यास, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रथम सर्वोकृष्ट क्लस्टर पुरस्कार आर्वी, ता. धुळे, राज्यस्तरीय आवास योजना ग्रामीण (रमाई, शबरी व पारधी) प्रथम निजामपूर, ता. साक्री, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रथम सर्वोकृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार तरडी, ता. शिरपूर, राज्यस्तरीय आवास योजना ग्रामीण (रमाई, शबरी व पारधी) प्रथम टेंभलाय, ता. शिंदखेडा, तसेच श्रीमती ललीला बागुल, रा.उडाणे यांना नवसाक्षरांना प्रमाणपत्र देवून पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत वाजवून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर धुळे पोलीस दलाचे आरपीआय परेड कमांडट मुकेश माहुले यांनी मंत्री महोदयांना मानवंदना देऊन रिपोटींग केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.
0000