विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा सहभाग आवश्यक- पालकमंत्री संजय शिरसाट

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका): शेवटच्या माणसाचा विकास या उद्देशाने शासन  वाटचाल करीत आहे. लोकांना तत्पर आणि दर्जेदार सेवा देतानाच विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा सहभाग आवश्यक आहे. आपण सारे मिळून आपला जिल्हा, राज्य आणि देश प्रगतीपथावर नेऊ या,असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात केले.

देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला.

यावेळी लोकसभा सदस्य संदीपान भुमरे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिणीयार तसेच छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सामाजिक  कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना पालकमंत्री शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा संदेशात शिरसाट म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी  चांगल्या प्रकारे होत आहे. त्याचीच प्रचिती मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमातून आपल्याला आली. आता मुख्यमंत्र्यांनी १५० दिवसांचा कृती कार्यक्रम दिला आहे. या उपक्रमांमध्येही नागरिकांना दर्जेदार व तत्पर सेवा देणे, हेच उद्दिष्ट शासनाचे आहे.

त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील वेरुळ या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १५६ कोटी रुपयांचा निधी खर्चून विकासकामे केली जाणार आहेत. भारतीय पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनात हा विकास केला जाणार आहे. याकडे मुख्यमंत्री महोदयांचे विशेष लक्ष आहे.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, जिल्ह्यात जुलै महिनाअखेर एकूण ७२२ रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा लाभ मिळाला असून ६ कोटी ४ लाख ९७ हजार ५०० रुपये इतका मदत निधी देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करीता ७३५ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना करीता १०४ कोटी रुपये तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना १० कोटी ४६ लक्ष रुपये असा एकूण ८४९ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे

‘विकसित महाराष्ट्र २०४७’, असे व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करत आहे.  हा राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा असेल. आपल्या जिल्ह्यातही हे सर्व्हेक्षण राबविण्यात आले आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग त्यात नोंदविण्यात आला आहे. त्यातून आपल्या जिल्ह्याची भविष्यातील वाटचाल निश्चित केली जाणार आहे,असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्यातील १०१५ हुन अधिक तरुण नवउद्योजकांनी स्वतःचे उद्योग-व्यवसाय उभारला आहे. यंदाही १९०० जणांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यातील नव उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात ४४१  वसतिगृहे सामाजिक न्याय विभागामार्फत चालविली जात आहेत. आता राज्यात आणखीन १२५ नवीन वसतीगृहे आपण उभारत आहोत. २५ हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेतही वाढ केली आहे.  तसेच

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध महामंडळांच्या शासन हमी रकमेत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रशासन उत्तम काम करीत असून त्यात लोकांचा सहभाग घ्यावा. लोकांच्या सहभागातूनच विकासाची ही वाटचाल यशस्वी होणार आहे,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते माजी सैनिक नायब सुभेदार रमेश सावळे, हवलादार विजय कुंटे, कारागृह उपमहानिरीक्षक येथील हवलदार संतोष जगदाळे, पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक दीपक परदेशी,प्र्मोद पवार, राजेंद्र मोरे यांना गौरविण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विराज रमेश पवार, हिंदवी धनंजय पाटील, रुद्र धनंजय पाटील, नील रविंद्र सोमडे यांनाही गौरविण्यात आले.

०००